Breaking News

कोल्हार ते बेलपिंपळगाव रस्त्याच्या कामात खासगी कंपनीकडून नियमांची पायमल्ली शरद नवलेंच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचे उपोषण


अहमदनगर / प्रतिनिधी  :
श्रीरामपूर तालुक्यामध्ये कोल्हार ते बेलपिंपळगाव रस्त्यावर खासगी कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात येत आहे. सदर कामाला परिसरातील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. हे काम बेकायदेशीरपणे सुरु असल्याची तक्रार करण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला केबल टाकताना शासनाने नियम ठरवून दिले आहेत. त्याचे सर्रास उल्लंघन करून सदर कंपनी रस्ते खोदाई करीत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता बांधकाम विभागाचे अधिकारी संबंधित कंपनीस पाठिशी घालत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी अहमदनगरमध्ये बांधकाम भवनाच्या आवारात उपोषण केले.
याप्रकरणी श्रीरामपूरचे शाखा अभियंता उपअभियंता यांना निलंबित करून संबंधित खासगी कंपनीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी उपोषणादरम्यान करण्यात आली. या उपोषणात शरद नवले यांच्यासह श्रीरामपूर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे, पंचायत समिती सदस्य सतिष कानडे, दत्तात्रय गांगर्डे,  दत्ताजी नागवडे, अप्पा लिप्टे, कान्हेगावचे सरपंच विशाल खरात, सुनिल गिरी, लाडगावचे सरपंच सिकंदर शेख, संपत गायकवाड, वियज काळे, चिमाजी राऊत, अरविंद साळवे, प्रशांत लिप्टे, डॅनियल साळवे, श्रीराम मोरे, शांतवन अमोलिक, बबन गायकवाड, अजिज शेख, जाकीर शेख, सुलेमान शेख, गणेश भाकरे, नामदेव मेहेत्रे, यशवंत बनकर, शकिल शेख, अली शेख, रामदास कांदळकर, दत्ताजी खेमनर, दत्तात्रय हळनोर, जालिंदर रोठे, संतोष बोरुडे, पप्पू हिवरकर आदी सहभागी झाले होते.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोल्हार ते बेलपिंपळगाव हा सुमारे चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावर खासगी कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरु करताना नियमांची सर्रास पायमल्ली केली आहे. कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांचे अभय असल्याने ठेकेदार मनमानी पध्दतीने काम करीत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची बेकायदा कत्तल करण्यात आली आहे. नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासून पंधरा मिटर अंतर सोडून काम करणे आवश्यक असते. याठिकाणी त्याचेही उल्लंघन करण्यात आले आहे. खोदाई कामाबाबत इशारा देणारे सूचना फलक लावणे, रिफ्लेक्टर लावणे अशा सुरक्षेच्या उपाययोजनांनाही हरताळ फासण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याचा मोठा त्रास परिसरातील गावांना होत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना वारंवार तक्रार अर्ज, निवेदने दिली. चुकीच्या पध्दतीने सुरु असलेल्या कामाचे पुरावे, फोटोही सादर केले. अतिशय गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असतानाही बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी तक्रारींनुसार कारवाई करण्याऐवजी कंपनीला पाठिशी घालण्याचे काम करीत असल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबविला. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांना तक्रार अर्ज देण्यात आले आहेत.