Breaking News

'ती' घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी : आठरे

अहमदनगर / प्रतिनिधी :
हिंगणघाट परिसरात अत्याचार करून जिवंत जाळलेल्या पीडित मुलीची मृत्युशी असलेली झुंज अपयशी ठरली. यापुढील काळात महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार थांबविणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक पाऊले उचलण्याची गरज आहे. पुन्हा अशा प्रकारच्या घटना होण्यासाठी सरकारने आरोपीला सर्वांसमोर फाशीची शिक्षा देणे गरजेचे आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी हिंगणघाट जळीत कांडातील घटना आहे, अशा आशयाचे निवदेन निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना देण्यात आले. यावेळी शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष रेशमा आठरे, सुनंदा कांबळे, सुनीता पाचारणे, निर्मला जाधव, सायरा शेख, शितल राऊत, उषा सोनटक्के आदी महिला उपस्थित होत्या.   
या निवेदनात म्हटले आहे, न्याय प्रक्रियेत महिलांवर होणाऱ्या अत्याचारातील प्रकरणे तातडीने निकाली काढणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर एकप्रकारचा वचक बसेल. हिंगणघाट जळीत कांडातील पीडित मुलीला न्याय देण्यासाठी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविले पाहिजे. यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सरकारने आरोपीला तितकीच वेदना देणारी कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे, हाच पीडितेसाठी खरा न्याय ठरेल. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबतचे कायद्यात बदल करुन कडक कायदे निर्माण करावे. समाजातील अशा पाशवी मनोविकृतीच्या लोकांना कायद्याची भिती निर्माण होईल, याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.