Breaking News

हे तर जुगाड सरकार ः कोल्हे कोपरगाव तहसील कार्यालयासमोर धरणे


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी ः
खोटी आश्‍वासने, भूलथापा आणि भाजपचा विश्‍वासघात करून सत्तेवर आलेले महा विकास आघाडीचे जुगाड सरकार काम बिघडवणार आहे. कुठे नाईट क्लब घेऊन बसलात येथे शेतकर्‍यांना दिवसा लाईट नसल्याने त्याची लाईफ खराब होत आहे.शेतकर्‍यांचा सातबारा उतारा कोरा करू, असे आश्‍वासन देऊन त्यांना फसवणार्‍या निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो, अशी भूमिका माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मांडली.
         येथील तहसील कार्यालयासमोर कोपरगाव शहर व तालुका भाजप तसेच मित्र पक्षाच्या वतीने मंगळवारी दिवसभर धरणे आंदोलन करून तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. भाजपचे प्रांतीक सदस्य रवींद्र बोरावके व भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम यांनी प्रास्ताविक केले. रमेश औताडे, रवींद्र आगवण, दीपक चौधरी, सुधाकर गाढवे, डॉ. गोरख मोरे, अनुराग येवले, बाळासाहेब अहिरे, विनोद राक्षे, बाळासाहेब वक्ते, कैलास रहाणे, एकनाथ फापाळे, लक्ष्मण पानगव्हाणे, शिवाजी ल हारे, स्वप्नील निखाडे, योगिता होन, विक्रम पाचोरे, दीपक गायकवाड, केशव भवर, श्‍वेतांबरी राऊत, सुनील देवकर, मच्छिंद्र टेके यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली.
  कोल्हे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात अनेकांनी गरळ ओकली. एक महिला म्हणून आपली अडवणूक केली. राज्याचे गृहखाते झोपले आहे त्यामुळे महिलांवर सध्या दिवसाढवळ्या अत्याचार वाढत आहेत. शेतकरी आज हवालदिल झाला आहे. हेक्टरी 25 हजार रुपये अवकाळी मदत देऊ म्हणून घोषणा करणारे आता मूग गिळून बसले आहेत. जाती-जातीत तेढ निर्माण करून स्वार्थासाठी भाजप व पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे.संविधान हेच अंतिम असून त्यानुसारच मोदी यांचे काम सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.
कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, महिला बचत गटाचे अध्यक्ष रेणुका कोल्हे, शिल्पा रोहमारे, विद्या सोनवणे, वैशाली सोनवणे, सुनीता संवत्सरकर, हर्षदा कांबळे, मंगल आढाव, वैभव आढाव, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, गटनेते रवींद्र पाठक, विजय वाजे, मनोहर शिंदे, सुधाप्पा कुलकर्णी, चांगदेव आसणे, नानासाहेब गव्हाणे, रामदास रहाणे, कैलास खैरे, बाळासाहेब पानगव्हाणे, संचालक अरुण येवले, ज्ञानेश्‍वर परजणे, साहेबराव कदम,  शिवाजी वक्ते, सुभाष आव्हाड, सत्येन मुंदडा, बबलू वाणी, शरद थोरात, निवृत्ती बनकर, त्र्यंबक सरोदे, संभाजी रक्ताटे, सोपान पानगव्हाणे, संजय होन, हरिभाऊ गिरमे, दीपक जपे, नारायण अग्रवाल, इलियास खाटीक, जितेंद्र रणशूर, सखाराम निकम, खलील कुरेशी, मोहम्मद पहिलवान, बाळासाहेब दीक्षित, भाऊसाहेब चौधरी, शिवाजी कोकाटे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक यावेळी उपस्थित होते.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसील कचेरीसमोर धरणे धरण्यात आले. 
विधिज्ञ रवींद्र बोरावके म्हणाले, विकास आघाडीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांना स्थगिती देऊन फडणवीस यांचे नुकसान केले नाही तर जनसामान्य जनतेचे मोठे नुकसान केले आहे. महाविकास आघाडीला जनतेच्या, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांचे घेणेदेणे नाही. तर त्यांना व्यक्तिगत स्वार्थामध्ये स्वारस्य आहे. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाने नगर, नाशिकमधील लाखो शेतकर्‍यांना देशोधडीला लावले. आता त्यांनाच पुन्हा सत्तेत पाठवले. पश्‍चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्याच्या निर्णय रद्द करून शेतकर्‍यांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे.
सूत्रसंचालन सुशांत खैरे यांनी केले.