Breaking News

चंदनापुरी घाटात टेम्पो जळून खाक शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता


संगमनेर/प्रतिनिधी ः
पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटामध्ये मालवाहू टेम्पोला आग लागली. यात हा टेम्पो जळून खाक झाला. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. मंगळवारी (दि.25)  पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, मालवाहू टेम्पो (एमएच 42 एक्यू 7644) चालकमालक दत्ता आण्णा टकले (राहणार तरंगवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) नाशिकहून सिमेंटच्या मोठ्या विटा घेऊन पुण्याकडे जात होते. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास टेम्पो चंदनापुरी घाटात आला. त्याच दरम्यान टेम्पोला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. टेम्पोला आग लागल्याचे टकले यांना लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या टेम्पोतून उडी घेतली. त्यांच्याशिवाय या टेम्पोत कोणीही नव्हते. काही वेळात आगीने रौद्ररुप  धारण केले.
टेम्पो पेटल्याने घाटामध्ये पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती डोळासणे महामार्ग पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संगमनेर शहरातून अग्निशमन दलाचे दोन बंबही आग विझविण्यासाठी आले. तोपर्यंत टेम्पोचा पुढचा भाग पूर्णपणे जळून गेला होता. टकले यांच्याकडे असलेले 26 हजार हे गाडीभाडे व पाकीट जळून खाक झाले.