Breaking News

सरपंचाच्या जनतेतून निवडीला बे्रक ग्रामपंचायत सदस्य करणार सरपंचाची निवड ; विधानसभेत विधेयक मंजूर


मुंबई : थेट जनतेतून सरपंच निवडीला बे्रक लागला असून त्यासंबधीचे विधेयक मंगळवारी विधानसभेत संमत करण्यात आले आहे. त्यामुळे सरपंचाची निवड आता ग्रामपंचायत सदस्य करतील. विधानसभेत आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून त्यामुळे थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल होणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या कृतीवर टीका केली आहे. सरपंच परिषदेच्या आग्रहाखातर हा निर्णय आम्ही घेतला होता, असे फडणवीस यांनी विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात सरपंचाची निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आणि सरपंच ग्रामपंचायतीतून निवडण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार देत याबाबतचे विधेयक विधिमंडळात मांडण्याची सूचना केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल आणि सरकार यात संघर्ष निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांबरोबर कोणतेही मतभेद नसून त्यांनी केलेल्या सूचना योग्य असल्याचे म्हटले होते. जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात घेत नाही, अशा तक्रारी आल्या कारणानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र कोश्यारी यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने राज्यपाल विरुद्ध सरकार असा वाद निर्माण होण्याचे चिन्हे दिसत होती. मात्र, राज्यपालांच्या या भूमिकेवर सरकारने अत्यंत सावध भूमिका घेत मोघम प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचे विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलं. त्याला आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आले आहे.