Breaking News

बुवा, नैतिकता हेच प्रबोधनकाराचे लक्षण

पाणीबचाव, व्यसनमुक्ती आदी गोष्टींवर कीर्तनातून प्रबोधन करणारे अहमदनगर जिल्ह्यातील ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख हे अपत्यप्राप्तीच्या वेगळ्या संदेशामुळे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी म्हटले होते की, स्त्रियांशी सम तिथीला संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला संग केला तर मुलगी होते. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनात सांगितलेले वाक्य काळाच्या कसोटीवर पारखले तर ते योग्य नाही,असे दिसते. कारण आज विज्ञानयुगात आम्ही वावरत आहोत. महाराजांनीही सायन्स पदवी, नंतर  बी. एड. केलेले आहे. त्यांनी एका शाळेत ज्ञानदानाचे कार्यही केले आहे. त्यामुळे महाराजांना विज्ञान  माहित नाही, असेही म्हणता येत नाही. विज्ञान काय आहे ते महाराज जाणतात. परंतु...हा परंतु आहे ना तो भल्याभल्या लोकांना जेरीस आणतो असे म्हणतात ! महाराजांनी कीर्तनात केलेले वक्तव्य खरेच विज्ञानाच्या कसोटीवर उतरते काय, असा विचार केला तर सुमारे 800 वर्षांपूर्वी लोक बहुतांशी  अनुभवातून तसे ठोकताळे मांडत होते, ते दरवेळी खरे ठरतील याची शाश्‍वती नाही. त्यामुळे कीर्तन करणार्‍या महाराजांनी वाचाल बोलणे टाळले तर सर्व काही योग्य होईल. जे विज्ञानाच्या कसोटीवर उतरते ते खरे, हे आजच्या जगाचे सूत्र आहे. या सूत्रानुसार जे बोलतील, राहतील,वागतील त्यांचेच या जगात समजून घेतले जाईल. अन्यथा ठोकताळ्यांच्या आधारे (जुजबी बोलणे) या गोष्टी जागृत लोकांना पटणार नाहीत. कारण आज समाज सर्व गोष्टी जाणतो, तो विज्ञानाची कास धरतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अभ्यासोनी प्रगटावे, अन्यथा बोलू नये. इंदुरीकर महाराजांना त्यांनी केलेल्या वक्तव्याचे काहीही वाटत नाही, हे विशेष आहे. इंदुरीकर यांनी बोललेले वाक्य एका ग्रंथातील आहे, आयुर्वेद ग्रंथातही हे वाक्य आहे. परंतु या वाक्याची प्रचिती सर्वांनाच आलेली नाही. त्यामुळे अशी विज्ञानाला बाधा आणणारी वाक्ये त्यांनीच नव्हे सर्व प्रबोधन करणार्‍या वक्त्यांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी टाळावीत, कारण समाज त्यांच्या बोलाण्यावर विश्‍वास ठेवतो आणि जनतेत चुकीचा संदेश जातो. निवृत्ती बुवांनी महाराष्ट्रातील तमाम महिला वर्ग, जनतेची जाहीर माफी मागितली असून नैतिकता हेच प्रबोधनकाराचे लक्षण असल्याचे दाखवून दिले आहे.             
महाराजांनी अपत्याप्र्प्तीचे सूत्र सांगितले ते एका ग्रंथातील आहे आणि हा ग्रंत्र सुमारे 800 वर्षांपूर्वीचा आहे. तो ग्रंथ म्हणजे ‘श्री गुरु चरित्र’ ! असो. त्या काळी विज्ञान प्रगत नव्हते, बहुतांशी लोकांना जे अनुभव येत असत, ते लक्षात ठेवून काही ठोकताळे मांडले जात. ते ठोकताळे नेहमी खरे ठरतीलच याची शाश्‍वती देता येत नाही, ही सत्य बाब आहे. असे असताना लोकांना प्रबोधनाच्या नावाखाली ठोकताळे सांगण्यात काय मतलब ? महाराजांना प्रसिद्धी माध्यमांनी उपस्थित केलेले प्रश्‍न खटकले असतील. ते म्हणाले की, कीर्तनाचा धंदा बंद करून आता शेती करण्याचा विचार करतोय. महाराज, लोक तुमचे कीर्तन ऐकायला येतात, ते तुम्ही व्यवहारातील उणीवा, चुका त्यांच्या लक्षात आणून देता आणि समाजाला चांगले मार्गदर्शन करता म्हणून ! कीर्तन ऐकणार्यांमध्ये बहुतांशी लोक आडाणी असतात, अशिक्षित असतात. काही असे असरतात की, महाराज म्हणाले म्हणजे सर्व काही बरोबर आहे असे समजणारे असतात. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. सध्या मुलगा, मुलगी होणे हे समान मानले जाते. त्यामुळे महाराजांनी जनतेच्या अडचणी, समाजातील चुकीच्या गोष्टी, चुकीच्या रूढी- परंपरा यांबद्दल प्रबोधन करणे जास्त हितावह ठरेल. इंदुरीकर महाराज हे बोलण्यात स्पष्टवक्ते, कीर्तनात समाजातील उदाहरणे देऊन लोकांना डोळस करणारे आहेत. परंतु... कीर्तनात बोलताना त्यांनी कधी कधी बोलण्याच्या ओघात काही चुकीची वक्तव्येही केल्याचे दिसते. स्त्रियांबद्दल बोलताना ते म्हणतात, पायातली वहाण पायातच ठेवलेली बरी ! अशा गोष्टी ऐकायला, मनोरंजनासाठी काही जणांना ठीक वाटतील, परंतु काळ बदलत आहे. स्त्री- पुरुष समानतेचे वारे वाहत आहे. स्त्रियांना शुद्र समजणारी व्यवस्था आज कालबाह्य ठरत आहे. त्यामुळे लोकांना कोणत्या गोष्टींच्या भजनी लावावे, हे समस्त महाराजांनी ठरविण्याची वेळ आली आहे. या लेखनाचा असा हेतू नाही की, प्रत्येक बुवा, महाराज चुकीचे बोलतात आणि ते प्रबोधन करत नाहीत. महाराजांनी वाचाळता बंद करून योग्य ते समाजाला दिले पाहिजे, याबाबत तर कुणाचे दुमत असण्याची शक्यता नाही. संत तुकाराम महाराजांनी अनेक चुकीच्या गोष्टींवर राळ उठवली होती, स्त्रियांना ते सन्मान देत होते. इंदुरीकर महाराजांना नेमके हेच नडले आहे. त्यामुळे त्यांचे कीर्तन ऐकताना लोक आता विचार करू लागले आहेत. कीर्तन सांगणारे महाराज मोठ्या खुबीने लोकांना उदाहरणे देत प्रबोधन करतात, याबाबत दुमत नाही. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये.
महाराष्ट्रातील एक कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची निरुपण करण्याची शैली वेगळी आहे, ते विनोदी ढंगाने लोकांमध्ये प्रबोधन करतात. त्यामुळे त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे. त्यात सर्वसामान्य लोक आहेत, नेते, अभिनेते असे अनेक आहेत. इंदुरीकर महाराजांचे विचार अनेक वेळा पटतात. परंतु कीर्तन करताना ते काहीवेळा जास्त बोलतात. उदा. स्त्रियांबद्दल विविध टिप्पणी करणे, त्यांची टर उडवणे. स्त्रीने नवर्‍याच्या पायातली वहाण बनून रहाणे कसे चांगले आहे, स्त्रियांनी जास्त बोलू नये अशा इंदुरीकरांच्या वाक्यामुये कीर्तनात अनेकांना चेव चढत असेल, परंतु ते समाजहिताचे नाही. लोकांना आपण काळाच्या मागे घेऊन तर जात नाही ना, याचा विचार अनेक वक्ते, महाराजांनी करावा. महाराष्ट्र ही क्रांतिभूमी आहे. या महाराष्ट्रात समाज परिवर्तन करण्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी अंधश्रद्धा निर्मुलन आणि जातीपातींचे उच्चाटन करून आजचा निकोप समाज घडवला आहे. समाजाचे विचार बदलण्यासाठी काही शतके जातात, त्यासाठी अनेक समाजसेवकांना बलिदान केले आहे . त्यामुळे क्रांतीचे चक्र कुणी उलटे फिरवत असेल तर त्याची समाज दखल घेतो आणि त्या व्यक्तीवर टीका होते. आज निवृत्ती महाराजांवर सर्वत्र टीका होत असतानाच काहीजण त्यांची बाजू घेण्यासाठी पुढे आले आहेत,हे नक्कीच योग्य नाही. महाराजांनी आपल्या पाठीराख्यांना आंदोलन करू नये, सर्व काही कायद्याप्रमाणे होऊ द्या, असे आवाहन केले आहे. असे आवाहन करणे महाराजांच्या नीतिमत्तेचा एक भाग आहे. स्त्रीमुक्ती चळवळीतील नेत्या तृप्ती देसाई यांनी निवृत्ती महाराजांना अटक करा, अशी मागणी केली आहे. निवृत्ती महाराजांचे समर्थक देसाई यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत. तसेच निवृत्ती महाराजांची बाजू घेणारे राजकारणीही आता यानिमित्ताने सक्रीय झाले आहेत, हे विशेष ! पुराणातील वांगी पुराणातच राहू द्या, ती नाकाने सोलण्याचे प्रयत्न करू नये. इंदुरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य मनुस्मृतीला धरून होते,आज भारतीय राज्य घटनेप्रमाणे कायदे चालतात. भारतीय राज्यघटनेत स्त्रियांना पुरुषांसोबत सर्व हक्क समान दिले आहेत. त्यामुळे सर्वानीच लोकशाहीच्या चौकटीत राहून वागले, बोलले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला या प्रकरणात इंदुरीकर महाराजानी म्हटले होते की, मी माझ्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही. परंतु नुकतीच त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. त्यांनी लोकलज्जेस्तव आपल्या विचारांत बदल केला असल्याचे दाखवले हे स्वागतार्ह आहे. अखेर या वादावर पडदा पडला आहे. समाजातील बदल घडवणार्‍या लोकांनी आपल्या वागण्यात नैतिक बदल करणे आणि आपली प्रतिमा सुधारणे हे उत्तम प्रबोधनकाराचे लक्षण आहे. आपणास काय वाटते?   
अशोक सुतार
मो. 8600316798