Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अहमदनगर/ प्रतिनिधी : भाजपप्रणित केंद्रशासनाच्या मागासवर्ग व इतर मागासप्रवर्गाचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कट केंद्र सरकार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच ओबीसींचे आरक्षण गोठविण्याच्या उद्दिष्टाने काम करीत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश व काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती-जमातीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना निवेदन दिले. यावेळी शहर विभाग अध्यक्ष नाथा आल्लाट समवेत जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, शीला दुसुंगे, शिवाजी जगताप, बंटी यादव, कमलेश गायकवाड, मनोज बिडवे, गौतम सूर्यवंशी, बाळासाहेब पगारे, संतोष पगारे, नामदेव चांदणे, सुभाष तोरणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय सेवेतील भरती प्रक्रियेत जाणूनबुजून वंचित घटकावर अन्याय केला जात आहे. वास्तविक, आरक्षण हा भारतीय संघटनेच्या कलम 16 मध्ये दिलेला अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या भाग 3 मधील 12 ते 35 हे सर्व मूलभूत अधिकारात समाविष्ट आहेत, असे असतानाही देशातील भाजप सरकार संवैधानिक आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, यासाठी एस्सी,एसटी, एन.टी. व ओबीसी यांना दिलेले आरक्षण परिपूर्ण लागू करावे, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाप्रमाणे कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी  अभ्यासक्रमासाठी या घटकांना त्यांच्या टक्केवारीप्रमाणे आरक्षण देण्यात यावे, यांसह विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या वतीने व काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती-जमातीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध व्यक्त करून निदर्शन करण्यात आले.