Breaking News

धर्मांध मानसिक गुलामगीरी झुगारून द्या!

प्रत्येकाची मानसिकता त्याचे विचारांशी असलेले जवळचे नाते विषद करते.मानसिकतेला अनुसरून शरीर वर्तन करते.या वर्तनात परिवर्तन घृडवायचे तर त्याची मानसिकता बदलण्यासाठी त्याला विचारांचे गुलाम बनवावे.माणूस विचारांचा गुलाम झाला की मानसिक गुलामगीरी आणि शरीर किंवा शरीराचे वर्तन गुलामगीरीत जायला वेळ लागत नाही.भारतीय बहुजन समाजाला अशाच पध्दतीने विचारांचा गुलाम बनवून धर्मांधांनी मानसिक गुलाम बनवले आणि हजारो वर्ष काही ठिकाणी शारिरिक गुलामगीरीही लादली.आज एकविकासाव्या शतकात छञपतींचा वारसा चालविणारी फुले शाहु आंबेडकर विचारधारा सर्व ताकदीनिशी संघर्ष करीत असूनही बहुजन समाज त्या मानसिक गुलामगीरीतून बाहेर पडायला धजावत नाही.शरद पवार यांच्यासंदर्भात गेले दोनचार दिवस जो गदारोळ उडाला होता,तो या मानसिक गुलामगीरीचेच द्योतक आहे.महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून देशपातळीवर परिचित आहे.धर्मांध शक्तीचे अनेक हल्ले परतवून लावत या मातीचा पुरोगामी अंकुर बहरत आहे.छञपतींच्या विचारांचा आणि कृतीशीलतेचा वारसा असलेल्या फुले शाहु आंबेडकर चळवळीची तळागाळात  रुजलेली मुळे पुरोगामीत्वाला सामर्थ्य देत आहे.हे खरे असले तरी महाराष्ट्राला हिणवण्यासाठी धर्मांध प्रत्येकवेळी फुले शाहु आंबेडकर चळवळीला लक्ष्य करतात.या चळवळीला बळ देणारे हात कमकुवत करण्यासाठी ही मंडळी कुठले तरी निमित्त शोधून आपल्या हस्तकांकरवी अशा नेतृत्वाला रोखण्याचा प्रायत्न वारंवार करतांना दिसतात.शरद पवार यांच्यावर झालेला तो शाब्दीक हल्ला  त्याचेच उदाहरण आहे.अशा धर्मांधांना साथ देण्यात पुन्हा वैचारीक गुलाम बनविलेल्या मानसिकतेचे बहुजन पुढाकार घेतात ही मोठी शोकांतिका आहे.
माणूस म्हणून ब्राम्हण बहुजनांसारखाच आहे.माञ जेव्हा ब्रम्हण्यवाद फोफावण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न होतो तेंव्हा माञ तो बहुजनांना प्रथम क्रमांकांचा शञू वाटायला हवा.कारण या देशाला ब्राम्हण्यवाद कसा आणि किती घातक आहे? या वादाने बहुजनांना कसे वैचारिक गुलाम बनवले हा काही नव्याने सांगण्याचा विषय नाही.यावर प्रचंड काथ्याकुट होऊन ते सप्रमाण सिध्दही झाले आहे.दुर्दैव इतकेच की आम्ही बहुजन आद्यापही ही गुलामाची वैचारीक मानसिकता झुगारून द्यायला तयार होत नाही.
मुळ मुद्दा हा आहे की,शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या निशस्र करायचे असेल तर त्यांना बहुजन समाजात असलेला आधार आधी दुबळा करायला हवा याची जाण असलेली मंडळी पध्दतशीरपणे बहुजनांची माथी भडकाविण्याचे कृष्णकृत्य कित्येक वर्षापासून करीत आहेत.शरद पवार ही एक व्यक्ती नाही तर ती एक चळवळ बनली आहे.केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवर राजकारण आणि समाजकारणात एक विद्यापीठ म्हणून शरद पवारांची ख्याती आहे.फुले शाहु आंबेडकर चळवळीला शरद पवार यांच्यामुळे नव उभारी आली आहे.राजकीय मतभेद कितीही टोकाला जात असले तरी बहुजन चळवळीचा आधारवड म्हणूनच शरद पवार या व्यक्तीमत्वाकडे पाहीले जाते.महाराष्ट्राला पुरोगामीत्वहिन करायचे असेल तर शरद पवारांसारखा जे जे नेतृत्व चळवळीला बळ देते त्या नेतृत्वाला संपविण्याचे कारस्थान केले जात आहे.बहुजनांचा देव म्हणून पंढरपुरचा विठोबा,या विठोबाच्या दर्शनाला जाण्यासाठी बहुजनांना कडव्या धर्मांधांची परवानगी मागायची का? अगदी सामान्यातला सामान्य बहुजन हवे तेंव्हा पंढरीच्या वारीला जाऊ शकतो.मग शरद पवारांसारख्या आधारवडाला रोखणारे हे कोण उपटसुंभ?
हा मुद्दा शरद पवार यांना पंढरपुरला जाण्यापासून रोखण्यापुरता मर्यादीत नाही.किंबहूना तो वाटतो तेव्हढा साधा आणि छोटाही नाही.समाज मनावर सनातनी धर्मांध विचार पुन्हा लादून मानसिक गुलामगीरीची दुसरी आवृत्ती अंमलात आणण्याचे हे षडयंञ आहे.सोशल मिडीयासारख्या हत्यारांचा वापर करून बहुजनांच्या मनावर वेगवेगळ्या पध्दतीने हल्ले सुरूच आहे.ज्यांची वैचारिक पाञता नाही असे अनेक भाऊ शरद पवार यांच्यासारख्या चळवळीतील अभ्यासू व्यक्तीमत्वावर लांछन लावण्याचा हिणकस प्रयत्न सतत करीत असतात.  शरद पवारांचा चळवळीचा व्यासंग आणि या कथित भाऊंची  वैचारीक पातळी दुरदुरपर्यंत तुलना होणार नाही .ते शरद पवारांच्या पासंगालाही पुरणार नाहीत.काळजी अशा  गोदी मिडीयाच्या तुकड्यावर पोसले  जाणार्‍या भाऊंनी शरद पवारांवर गरळ ओकणे म्हणजे   भर दुपारी चकाकणार्‍या सुर्याच्या नजर भिडविण्याचा अघोरीपणा करण्यासारखे आहे.त्यांची ही हिंमत होण्यास आमच्याच बहुजनांची मानसिक गुलामी कारणीभूत ठरत आहे.
बहुजनांचे एकमेव दैवत म्हणजे पंढरीचा विठूराया.महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून लक्षलक्ष वारकर्‍यांचा जथ्था शेकडो वर्षापासून पायपीट करीत विठूरायाच्या दर्शनासाठी जातो.ही उर्जा पुरोगामी महाराष्ट्राची खरी ताकद आहे.हे जाणून असलेल्या धर्मांधांना या उर्जेवर नियंञण मिळवायचे आहे.हा उर्जेचा स्रोत नियंञणात आला तर महाराष्ट्राचे पुरोगामीत्व हिरावून या मातीत धर्मांध बीज रूजविणे सहज सोपे होईल हे कडवी मंडळी जाणून आहेत.त्यासाठीच हातपाय खोडले जात आहेत.या आक्षेपाला ऐतिहासीक आणि विद्यमान दाखले आहेत.ज्या सनातन्यांनी माऊलीला धर्म भ्रष्ट ठरविण्याचा उन्माद केला,संत शिरोमणी तुकारामांना ज्यांनी अनन्वित छळले त्याच शक्ती पुन्हा कार्यरत झाल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते.

आजही बहुजन समाजातील किर्तनकार,प्रवचनकार समाज प्रबोधनाचा वसा चालवत आहेत त्यांनाही छळण्यासाठी ही मंडळी निमित्त शोधत असतात.धर्मांधांचा अंकुश असलेल्या संस्थांनी माऊली,संत शिरोमणी,संत नरहरी,संत नामदेव,सावता माळी,संत रोहीदास ,संत गोरोबा कुंभार अशा संत महात्म्यांना केवळ प्रबोधनातून समाज जागृती करतात म्हणून बहिष्कृत केले.त्या शक्ती संत महात्म्यांचा वारसा चालवणार्‍या  आजच्या किर्तनकार प्रवचनकारांना जा
णिवपुर्वक छळत  असल्याच्या घटना घडत आहेत.या छळवादाच्या षडयंञातून बहुजन चळवळीला संरक्षण द्यायचे असेल तर बहुजनांनी धर्मांध मानसिकतेची गुलामगीरी झुगारून द्यायला हवी.