Breaking News

करंदी परिसरात बिबट्याची दहशत पिंजराही ठरतोय कुचकामी


पारनेर/ प्रतिनिधी ः
तालुक्यातील करंदी येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या वारंवार आढळत आहे. बिबट्याने या भागात शेळ्या, कुत्र्यांवर हल्ला केल्याचेही प्रकार घडले आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वनविभागाने पिंजरा लावला मात्र त्यात बिबट्या जेरबंद झालेला नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थांना जनावरांची चिंता सतावत आहे.
करंदी येथे कडाणी मळा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या अनेकवेळा आढळून आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पशुपालकांच्या शेळ्या, वासरे ठार झाली आहेत. याशिवाय काही पाळीव कुत्रेही बिबट्याची शिकार झाले आहेत.
पशुपालक बाळासाहेब गेनू ठाणगे यांची शेळी तर दत्तात्रय तुकाराम ठाणगे यांचेे वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. सतीश कैलास ठाणगे, श्रीधर बाबा ठाणगे आपल्या शेताला पाणी देत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रसंगावधान साधून आपला जीव वाचवला. ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधत वनअधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर वनाधिकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी करून त्या ठिकाणी पिंजरा बसवण्याची व्यवस्था केली. परंतु पिंजरा बसवूनही हा बिबट्या या पिंजर्‍यात जेरबंद झालेला नाही. वनाधिकार्‍यांनी याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी माजी सरपंच सुनील ठाणगे, संतोष थोरात, शहाजी ठाणगे, संतोष मोहिते, राजेंद्र चौधरी, साहेबराव गांगड, श्रीधर ठाणगे, भास्कर चौधरी, रखमा फराटे, अर्जुन ठाणगे, रामचंद्र ठाणगे, बाळू औटी, जितेंद्र उघडे, अशोक ठाणगे, दादाभाऊ ठाणगे यांनी केली आहे.