Breaking News

पाथर्डी तालुक्यातील कॉपीला आळा घालावा मनसेचे जिरेसाळ यांची मागणी


पाथर्डी/प्रतिनिधी ः
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होणार्‍या परीक्षेतील कॉपीच्या प्रकारांवर आळा घालावा, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी केली. त्यांनी उपजिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
जिरेसाळ म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राला कीड लागली आहे. यामुळे राज्यभरात तालुक्याची बदनामी होत आहे. या प्रकारांनी विद्यार्थी, पालकांची आर्थिक, मानसिक घुसमट होत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात होत असलेला हा प्रकार अतिशय किळसवाणा आहे. या शैक्षणिक पर्यटकांमुळे पाथर्डीसारख्या ग्रामीण भागातील संस्कृती असलेल्या शहरातील सामाजिक वातावरण खराब होत आहे. या प्रकाराचा बंदोबस्त करण्यात यावा, असे ते चर्चेदरम्यान म्हणाले.
यावर उपजिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी कॉपीसारखा प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. शिक्षण संस्थांच्या फक्त पैसा कमावण्यासाठी चाललेल्या अशा गैरप्रकारांमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र व पाथर्डी शहर बदनाम होत आहे, असे म्हटले. हा प्रकार थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. पाथर्डी तालुक्यातील शिक्षण संस्थांमध्ये यापुढे कुठल्याही स्वरुपात कॉपी करण्यासाठी अ‍ॅडमिशन हा निंदनीय प्रकार होऊ देणार नाही, अशी भूमिकाही केकाण यांनी घेतली.
मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट, परिवहनचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष रंगनाथ वांढेकर, एकनाथ सानप, उपविभाग अध्यक्ष बाबासाहेब सांगळे, शहर सचिव संदीप काकडे, शहर उपाध्यक्ष सोमनाथ फासे, राजू गिरी, मुनीर तांबोळी, संजय चौनापुरे, विभाग अध्यक्ष गणेश कराडकर, एकनाथ भंडारी, अजय बेळगे, ज्ञानप्रबोधिनी अभ्यासिकेचे रामभाऊ केदार निवेदन देताना उपस्थित होते.