Breaking News

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप सासू-सासर्‍याला सश्रम कारावास


बेलापूर/प्रतिनिधी ः
पत्नीचा गळा आवळून खून करणार्‍या पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी त्याच्या आईवडिलांना प्रत्येकी दोन वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी ही  शिक्षा सुनावली.
किशोर मुरलीधर बाचकर असे जन्मठेप सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचे वडिल मुरलीधर सबाजी बाचकर, आई तान्हाबाई सबाजी बाचकर अशी कारावास सुनावलेल्यांची नाव आहेत. ते नेवासे तालुक्यातील वाटापूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी जयश्री किशोर बाचकर हिचा वेळोवेळी पैशासाठी व मुलबाळ होत नाही म्हणून छळ केला होता. 25 ऑगस्ट 2017 रोजी जयश्रीचा गळा दाबून खून करण्यात आला होता. त्यावरून जयश्री हिचे वडील दादाभाऊ लिंबाजी थोरात (राहणार ढवळपुरी, ता. पारनेर) यांनी तिच्या छळाबाबत व खुनाबाबत पती, सासू-सासरे अशा एकूण चार व्यक्तींविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती.
त्यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास झाला होता. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.या खटल्यात चौकशीकामी एकूण 11 साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले. या प्रकरणात फिर्यादी, डॉ. पवार व इतर साक्षीदार यांचे जबाब व परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला. सरकारपक्षातर्फे साक्षीपुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली. खटल्यात एका आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारपक्षातर्फे बेलापूर येथील मच्छींद्र गवते यांनी काम पाहिले.