Breaking News

श्रीगोंदेच्या पूर्व भागात विजेचा लपंडाव दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांवर वर्गणी करण्याची वेळ


कोळगाव/ प्रतिनिधी :
श्रीगोंदे तालुक्याच्या पूर्व भागात शेती पंप आणि घरगुती विजेचा लपंडाव सुरु आहे. दिवसभरात काही मिनिटेही वीज पुरवठा सुरळीत रहात नाही. यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. विजेअभावी पिके जळत असल्याने त्याची वसुली वीज वितरण अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर निश्‍चित करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
     तालुक्यात वीज उपकेंद्र मुबलक असल्याचा दावा आमदार बबनराव पाचपुते यांनी यापूर्वी कित्येक वेळा केला आहे. असे असताना शेतकर्‍यांना वीज का मिळत नाही, असा सवाल शेतकरी करत आहेत. पावसामुळे सध्या विहिरी आणि बोअरवेलला पाणी आहे. परंतु पिकांना पाणी देण्यासाठी वीज नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. त्या ठिकाणी दिवसभरात किती वेळा वीज गेली याच्या नोंदी केल्या जातात काय? याचा हिशेब घेऊ, असे शेतकर्‍यांनी सांगितले.
            श्रीगोंदे तालुक्यात शेतीसाठी तीन टप्प्यात विजेचे वितरण केले जाते. त्यामध्ये रात्री 10 ते सकाळी सहा या वेळेतील वीजपुरवठा शेतकर्‍यांना अडचणीचा ठरत आहे. परंतु पर्याय नसल्याने शेतकरी रात्रीदेखील शेतात जात आहेत. रोहित्र जळाले की करा वर्गणी, ऑईल नाही करा वर्गणी, इतर काही अडचण आली करा वर्गणी, असा प्रकार वारंवार होत आहे. सगळाच भुर्दंड आम्ही सोसायचा मग वीज वितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे कामच काय? , असा प्रश्‍न नागरिक करत आहेत.
    वीज गेली असता कर्मचारी वर्गास फोन केल्यास वरून वीज गेली असे सांगून कर्मचारी मोकळे होतात. तर अधिकारी शेतकर्‍यांचा फोनच घेत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुरता अडचणीत आला आहे.
         शेतीला वीज पूर्णदाबाने देत असल्याचा दावा वीज वितरण कार्यालय वेळोवेळी करत आहे. मात्र त्यांचा तो दावा खोटा आहे. याची दखल वरिष्ठ कार्यालय घेणार नसेल तर मात्र वीज वितरण कार्यालयास टाळे ठोकण्याचा पवित्रा शेतकरी घेण्याच्या तयारी आहेत.