Breaking News

मोकाट जनावरे नाहीतच ती! अहो, ती तर कत्तलखान्यांची संपत्ती!


या शहरात काय चाललंय, हे पाहून कोणाचंही डोकं चक्रायला लागेल, भणभणायला लागेल, संताप येईल, तळपायाची आग मस्तकापर्यंत जाईल. कारण मनपा कोंडवाड्यात असलेली गाय आणि तिचं वासरू मरणयातना सहन झाल्याने मृत्युमुखी पडतात. इतकंच नाही, या गायीच्या आणि वासराच्या पोटातून प्लास्टिक, तारा असं काही भयानक असल्याने या जनावरांची रवंथ करण्याची क्षमता आणि प्रतिकार शक्ती दोन्हीही कमी झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पस्ष्ट केले आहे. मात्र कोंडवाड्यात नेण्यापूर्वी ही जनावरे काय खात होती, कुठे चरत होती, हे पाहण्यासाठी कोणालाच वेळ नाही. एक मात्र नक्की ही जनावरे मोकाट नाहीत, हे निर्विवाद सत्य आहे. कारण कोणताही शेतकरी आपल्या पाळीव गायीला असे तडतडफ़डू मरू देणार नाही, हे शंभर टक्के खरंय. ही जनावरे शहरात पहाटेच सोडली जातात आणि दिवसभर चरून झाल्यानंतर ही जनावरे सोयीस्कररित्या कत्तलखान्यात नेली जात असल्याचे शहरातील नागरिकांच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे ही जनावरे मोकाट नसून कत्तलखान्याची संपत्ती असल्याचे स्पस्ष्ट झाले आहे.
या ऐतिहासिक शहरात गायी, म्हशी आदी जनावरांसाठी गवळी समाजाचे प्रशस्त गोठे आहेत. त्यांची ही जनावरे चारण्यासाठी जरी बाहेर सोडली जात असली तरी त्याकामी एका खास मानसाची नेमणूक केली जाते. त्यामुळे ही जनावरे इतरत्र उधळत नाहीत, कचराकुंडीवर काहीही खात नाहीत. मात्र शहराच्या विविध भागांत गावरान गायी, त्यांची वासरे ही जनावरे कचराकुंडीवर जाऊन त्याठिकाणी असलेले प्लास्टिक तसेच टाकाऊ वस्तू आदी खातात. परिणामी त्यांची रवंथ करण्याची क्षमता आणि प्रतिकार शक्ती कमी होते. कोंडवाड्यात मेलेली जनावरेदेखील याचा वर्गवारीत येतात. सध्या मनपाचा कोंडवाडा चालविणाऱ्या नगरसेवक सतीश बारस्कर यांच्याशी 'दैनिक लोकमंथन'ने संपर्क साधून त्यांच्याशी झालेली चर्चा यापूर्वी प्रकाशितदेखील केलेली आहे. यासंदर्भात बोलतांना त्यांनी सांगितले होते, 'आम्ही जनावरांना खायला वैरण आणि उसाची कुट्टी देतो. परंतु कोंडवाड्यात येण्यापूर्वी ही जनावरे कचराकुंडीवर काहीही खातात, त्यात आमचा काहीही दोष नाही'. मध्यंतरी हे प्रकरण कोर्टातही गेले आहे. मनपाच्या कोंडवाड्यात या जनावरांना बांधले जाते आणि काही दिवसानंतर संबंधित जनावर मालकांनी मनपाचा दंड भरला, की ही जनावरे पुन्हा रस्त्यावर आणि इतरत्र कळपाने हिंडतात आणि कचराकुंडीवर काही बाही खातात. परिणामी या जनावरांना भयानक व्याधी होतात. आता प्रश्न असा आहे, मनपाकडे कोंडवाडा आहे, जनावर मलाकांविरुद्ध दंडात्मक कारवाईही केली जाते, मग पुन्हा तीच जनावरे शहराच्या विविध भागांत का आणि कोणाच्या 'निगरानी'खाली हिंडतात? जांवर मालक या जनावरांना मोकळे सोडण्यापूर्वी या मुक्या जनावरांच्या आरोग्याची काळजी का घेत नाहीत? या जनावरमालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद का नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे ना जिल्हाधिकाऱ्यांकडे ना मनपाकडे. नगरकरांनी असेच आयुष्यभर मोकाट जनावरांच्या हालअपेष्टा उघड्या डोळ्यांनी पहायच्या आणि कानांनी ऐकायच्या, इतकंच.