Breaking News

जागतिकीकरणात मराठी भाषेसमोरील आव्हाने

मराठी भाषेचा आपल्याला अभिमान आहे, त्या भाषेत अनेक दर्जेदार साहित्यकृती जन्माला आल्या म्हणून आपली भाषा श्रेष्ठ असल्याचा आपण अभिमान बाळगतो. मात्र भाषेच्या संवर्धनासाठी आपण काय करतो, हे पाहणे देखील महत्वाचे आहे. मराठी भाषेचे जागतिकीकरण झाले पाहिजे, ती महाराष्ट्रच सोडून इतर राज्यात, इतर देशात बोलली पाहिजे, यासाठी व्यापक दृष्टीकोनातून आपण कोणते धोरण स्वीकारले, त्यादृष्टीनेक काय उपाययोजना केल्या, हे पाहणे महत्वाचे ठरते. जागतिकीकरणात मराठीने आपले स्थान पक्के केल्याशिवाय मराठीचे जागतिकीकरण होणार नाही, हेही खरे. प्रत्यक्षात मात्र परभाषकांना मराठी शिकवण्याच्या पद्धतींचा पुरेसा विकास झाला नाही. हे खेदाची बाबच म्हणावी लागेल. राज्यात राहणार्‍या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे, असा अट्टाहास आपण धरतो. परंतु राज्यात राहणार्‍या प्रत्येकांने आपण मराठी भाषा शिकले पाहिजे, यासाठी कोणता उपक्रम आपल्याकडून राबविला जाते, याचे उत्तर शोधले तर नकारात्मकच येतो. म्हणजेच मराठी भाषेचा आपला अभिमान हा वरवरचा असल्याचे दिसून येते. मराठी भाषेला आपण जन्मदात्री म्हणतो. माय मराठी म्हणतो. मात्र तिच्या संवर्धनासाठी, तिचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी आपले प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या भाषिक व्यवहारांचे निरीक्षण केल्यास मराठीच्या पीछेहाटीची कारणे लक्षात येतात.
जन्मल्यानंतर कौटुंबिक परिचितांशी संदेशनाची व्यवहाराची भाषा, स्थानिक बोली, त्या त्या विशिष्ट प्रदेशातील एक प्रादेशिक बोली, औपचारिक शिक्षणाचे माध्यम प्रमाण मराठी, न्यायसंस्था, आर्थिक संस्था, उद्योगधंदे वगैरे उपजीविकेशी संलग्न व्यवहाराची भाषा इंग्रजी, महाराष्ट्राच्या शासन व्यवहाराची भाषा मराठी व इंग्रजी, मोठ्या शहरातील बाजाराची, विनिमयाची भाषा हिंदी, करमणुकीच्या क्षेत्रात मुख्यत्वे हिंदी, केंद्र सरकारच्या कार्यालयांची भाषा हिंदी व इंग्रजी असा भाषिक व्यवहाराचा नकाशा दर्शवता येतो. अशा भिन्न भाषिक व्यवहारामुळे नेहमीच्या जगण्यातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होते नाही आणि आपल्या हातून ज्ञाननिर्मितीही होत नाही. ज्ञान पाश्‍चिमात्यांनी निर्माण करायचे आणि आपण त्याची फक्त माहिती मिळवायची असा प्रकार सतत चालू असतो. आपली विद्यापीठेही ज्ञाननिर्मितीची नव्हे तर माहिती वितरणाची केंद्रे झाली आहेत. नैसर्गिक विज्ञान, सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या व आधुनिक ज्ञानक्षेत्रांमध्ये जर आपण मौलिक भर घालीत गेलो तरच या क्षेत्रातील आपले ‘दुय्यम नागरिकत्व’ नाहीसे होईल. यासाठी मातृभाषा याच ज्ञानभाषा होणे हा एक मार्ग आहे.
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केल्या गेलेल्या 22 भाषांपैकी मराठी ही महत्त्वाची भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी बोलणार्या लोकांची संख्या दहा कोटींवर आहे. इंटरनेटवरील विकिपीडिया या ज्ञानकोशातून मिळणार्या माहितीनुसार मराठी ही जगातली 19 व्या क्रमांकाची भाषा आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. बोलीभाषा तर कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिकीकरणाच्या वेगवान रेट्यात निर्माण होणार्या संधीचा लाभ घेण्याची जनसमूहांची मानसिकता हाही भाषिक र्हासाला कारणीभूत ठरणारा घटक आहे. भारतातच नव्हे, तर आशियात तसेच आफ्रिकी देशांतही लोकांना असे वाटते की त्यांनी त्यांच्या मुलांना इंग्रजी, फ्रेंच किंवा स्पॅनिश भाषेतून शिक्षण दिलं तर मोठेपणी मुलांना व्यवसायाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात रोजगार मिळेल. जेव्हा एखाद्या समाजाला असं वाटायला लागतं की त्याला उदरनिर्वाहासाठी दुसर्या भाषेत शिक्षण घेणं गरजेचं आहे, तेव्हा तो समाज नवीन भाषिक परिस्थिती स्वीकारायचा निर्णय घेतो. म्हणूनच सध्याच्या विकासाच्या कथित भांडवली जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भाषिक-सांस्कृतिक संहार दडला आहे का? असा प्रश्‍न निर्माण होतो. जागतिकिकरणामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रातील लोकं मुंबई, पुणं, नागपूर सोडून अमेरीका, आस्ट्रेलिया, युरोपमध्ये पोटापाण्यासाठी गेली आहेत. खुद्द महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखे शहर व्यापारी पेठ असल्याने इतर प्रांतातील लोकं येऊन स्थानिक झाली आहेत.
आईवडील मुंबईत आणि मुलगा अथवा मुलगी हैद्राबाद, बंगळुरुला किंवा आईवडील मुंबई, पुण्यात आणि मुलं अमेरीकेत अशी उदाहरणे आपल्याला आजच्या समाजात सर्रास दिसतात. इंग्रजी ही अभ्युदयाची दारं उघडणारी भाषा झाल्याने सर्व शिक्षण इंग्रजीत घेतलेली आणि मराठी साहित्यात पु.लं. शिवाय साहित्यिक माहिती नसलेली एक पिढी आपल्याला समाजात दिसते. मग अशा बदललेल्या काळात मराठी टिकवण्यासाठी आपण काय कले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याची गरज आहे. मराठी भाषेमध्ये सतत नवनिर्मिती होणं आवश्यक आहे. आपआल्या क्षेत्रातील यशस्वी माणसांनी आपले संशोधन, आपले विचार मराठी भाषेत मांडणे आवश्यक आहे. जागतिकीकरणाने आपल्या समग्र अशा सांस्कृतिक आकृतिबंधाला नवा आकार दिल्यामुळे एका नव्या संस्कृतीचा उदय झाला आहे. ही संस्कृती तंत्रज्ञानाने व्यापलेली असल्यामुळे आपले सांस्कृतिक वैविध्य आणि भाषा व साहित्यावर याचा मोठाच परिणाम झाला आहे. या परिणामाची चर्चा यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या माध्यमातून होत आली आहे. विशेषतः साहित्याच्या क्षेत्रात तर ही चर्चा विविधांगी स्वरुपाची राहिली आहे. तरीही या प्रभावाचे अनेक पैलू दूर्लक्षितच राहिली आहेत. जागतिकीकरणाच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या नवसंस्कृतीतून एक ‘नव-अभिजन वर्ग’ अस्तित्वात येत आहे. या नवसंस्कृतीच्या माध्यमातून आपले ऐतिहासिक संचित नाकारण्यासाठी सोय ‘एण्ड ऑफ हिस्टरी’च्या नावाने पद्धतशीरपणे रुजवली जात आहे. या नव-अभिजनवर्गासमोर ‘माध्यमक्रांती’ आणि माहितीचा प्रचंड स्फोट आणि तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व विकासाचे गोंडस आकर्षण निर्माण केले गेले आहे. माहिती-तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे जागतिक असल्याने या क्रांतीला आपल्या अभिव्यक्तीसाठी इंग्रजीसारखी ग्लोबल भाषा हवी आहे. या माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीला कसे सामोरे जायचे, हा आज मराठी भाषेपुढचा खरा प्रश्‍न आहे.