Breaking News

साई दरबारी भेदभावाला थारा नाही : महापौर वाकळे


अहमदनगर / प्रतिनिधी
या प्रभागाचे नगरसेवक कायम तत्पर असतात. प्रभागातील प्रत्येकाची त्यांचा व्यक्तिगत परिचय आहे. या प्रभागात सर्वात जास्त कामे मागील सहा महिन्यात त्यांनी करून घेतली आहेत. येथील साईंचे मंदिर परिसर अंत्यत आकर्षक असून मंदिराला सर्वोतोपरी सहकार्य करू. साई दरबारी कोणी मोठा छोटा नाही कुठला पक्ष, जात भेदभाव नाही, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. 
वसंतटेकडी येथील श्रीराम चौकातील संदेशनगरमधील साई मंदिरात प्रत्येक महिन्यात शेवटच्या गुरुवारी साईंची महाआरती, विविध सांस्कृतिक तसेच भक्तिमय कार्यक्रम, महाप्रसाद असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ब्रम्हानंदी भजनी मंडळाची भजनसंध्या, महाप्रसाद संपन्न झाला. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते साईंची महाआरती झाली. यावेळी ते बोलत होते. वैशाली मगर, प्रा.  बोडखे, नगरसेवक सुनील त्र्यबंके, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, अध्यक्ष योगेश पिंपळे, दीपक कुडिया आदींसह साईभक्त मोठ्या संख्येने  उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, संदेशनगरच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी तसेच परिसरातील तरुण मंडळांनी परिश्रम घेतले.