Breaking News

अवैध शस्त्र वाहतूक प्रकरणी तिघे ताब्यात देशी बंदूक व ३८ जिवंत काडतुसे जप्त


संगमनेर /प्रतिनिधी
 संगमनेर शहर पोलिसांनी अवैधरित्या देशी बंदूक जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. शहराजवळ संगमनेर खुर्द शिवारातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रायतेवाडी फाटा येथे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दिलीप कोंडीबा खाडे (वय २८, रा. म्हस्के बुद्रुक तालुका शिरूर, जिल्हा पुणे), बाबाजी बबन मुंजाळ (वय २७, रा.डोंगरगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे), दयानंद मारुती तेलंग (वय ३०, रा. टाकळी हाजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत
 नाशिककडून पुण्याकडे जाणाऱ्या एका मोटारीतून काही युवक बेकायदा शस्त्रास्त्र घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर खुर्द शिवारातील रायतेवाडी फाटा येथे सापळा लावला. रात्री पावणे अकराच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. एमएच १४ व्ही ३६००) जाणाऱ्या युवकांची संशयावरून झडती घेतली असता, त्यांच्याकडे पाच जिवंत काडतुसे असलेला देशी बनावटीचा बंदूक केएफ .६५ कॅलिबरची नोंद असलेली ३३ जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी त्यांच्या मोटारीसह तीन मोबाइल, देशी बनावटीचे पिस्तूल ३८ काडतुसे असा सुमारे लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस नाईक विजय पवार यांच्या फिर्यादीवरून तीनही आरोपींच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं.८३/२०२० भारतीय हत्यार कायदा कलम /२५ प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करुन त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केली.

 सदरची कारवाई शहर पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस उप-निरीक्षक संजय कवडे त्यांचे पथकाचे पोहेकॉ राजेंद्र डोंगरे, पो.ना. विजय पवार, पो.कॉ सुभाष बोडखे, पो.कॉ. अमृत आढाव, पो.कॉ. साईनाथ तळेकर पोकॉ प्रमोद गाडेकर यांनी केली