Breaking News

शेतकर्‍यांवरील गुन्हे दाखल मागे घ्यावेत आमदार काळे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी


 कोपरगाव/ प्रतिनिधी ः
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांनी आपल्या न्याय हक्कासाठी  विविध आंदोलने केली. त्यावेळी अनेक शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गृहखात्याने हे गुन्हे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.
   आमदार काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपासून सातत्याने पडत असलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आला होता. एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे शेतमालाला मिळत नसलेला अपेक्षित दर यामुळे शेतकरी पिचला होता. तत्कालीन शासनाचेही शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकर्‍यांनी आपल्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने केली. शेतकर्‍यांनी केलेली  आंदोलने ही पूर्णत: शांततेच्या मार्गाने झाली आहेत. तत्कालीन शासनाने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकर्‍यांना रास्तारोको आंदोलन देखील करावे लागले आहे.  या रास्ता रोको आंदोलनात काही समाजकंटकांनी सहभागी होऊन या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील एका शेतकर्‍याला आपला प्राणदेखील गमवावा लागला आहे. चुकीचे लोक या आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्या चुकीमुळे गुन्हे मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर दाखल करण्यात आले आहे, या मुद्द्यांकडे आमदार काळे यांनी गृहमंत्री देशमुख यांचे लक्ष वेधले.
आंदोलनावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा ससेमिरा शेतकर्‍यांच्या मागे लागल्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील सरकारने अन्याय केल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये आहे. न केलेल्या गुन्ह्याच्या पोलिसांच्या चौकशीला शेतकर्‍यांना सामोरे जावे लागत आहे.  या परिस्थितीचा आपण विचार करून ज्या शेतक-यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.