Breaking News

देवाचे नाव व्यवहाराकरिता वापरू नका ऋषीकेश पुरी महाराज यांचा उपदेश


बेलापूर/प्रतिनिधी ः
जे केल्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवू नये? जसे देहावर प्रेम करता तसे भगवंताच्या नामावरही प्रेम करा. देवाचे नाव व्यवहाराकरिता उपयोगात आणू नका, असा उपदेश ऋषीकेश पुरी महाराज यांनी केला.
   श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे हरिहर केशव गोविंद मंदिरात भगवान विठ्ठल कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेच्या निरुपण कार्यक्रमाची सांगता झाली. त्यावेळी पुरी महाराज बोलत होते. कथेच्या निमित्ताने कृष्ण जन्म, विठ्ठल- रक्मिणी विवाह असे जिवंत देखावे सादर करण्यात आले होते. कथा निरुपणावेळी पंचायत समिती सदस्य अरुण नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुधीर नवले, उपसरपंच रवींद्र खटोड, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, भरत साळुंखे, नगरसेवक रवी पाटील, प्रवीण फरगडे, रणजित श्रीगोड, प्रशांत लड्डा, मनोज श्रीगोड, अतीष देसर्डा, कमलेश दायमा उपस्थित होते.
पुरी महाराज म्हणाले, नामस्मरण नामा करिताच करत जा म्हणजे खरा आनंद तुम्हाला मिळेल. भजन करीत असताना देहभान विसरून भजन करावे. संसारात आपण  कोण आहे हे न विसरता संसार करावा. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. भगवंताजवळ आपण लहान मुल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटायचा नाही. तो तुमच्या सह्याला आल्यावाचून राहणार नाही, असेही महाराज म्हणाले.
   कथेच्या सांगताप्रसंगी विठ्ठल नामच्या गजरात महिलांनी फुगड्या खेळल्या. ग्रंथाची सवाद्य मिरवणूक काढून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिगंबर नाईक, माणिक साळुंके, मंगल दायमा, पद्मा साळुंके, उषा रोकडे, सुभाष उंडे, सोमनाथ टाक, हरिभाऊ भगत, नंदकुमार गोरे आदींनी परिश्रम घेतले.