Breaking News

भारत-अमेरिका यांच्यात तीन अब्ज डॉलरचा संरक्षण करार ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्दयावर पाकिस्तानलाही सुनावले


नवी दिल्ली ः पाकिस्तानच्या भूमीवरुन सुरु असलेल्या दहशतवादला लगाम घालण्याची गरज असल्याचे मत अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले असून, दहशतवादाच्या मुद्द्यावर त्यांनी पाकिस्तानला देखील सुनावले आहे. यावेळी भारत-अमेरिका यांच्यात तीन अब्ज डॉलरचा संरक्षण करार करण्यात आला.
ट्रम्प आणि मोदींनी दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा उल्लेख केला. ट्रम्प यांनीही भारताचा हा दौरा अविस्मरणीय असल्याचे म्हटले. भारताने अमेरिकेबरोबर 3 अब्ज डॉलरचा करार केला आहे. यात अमेरिकेकडून 24 एमएच 60 रोमिओ हेलिकॉप्टर खरेदीचा 2.6 अब्ज डॉलरचा करार आहे. अन्य एका व्यवहारात 6 एएच 64 इ अपाचे हेलिकॉप्टर खरेदीचा सुमारे 80 कोटी डॉलरचा करार आहे. ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे दोन्ही देशात संरक्षण संबंध आणखी मजबूत होतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनीही संयुक्त पत्रकार परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही भारत-अमेरिका भागीदारीच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर चर्चा केली. यात संरक्षण आणि सुरक्षा या विषयांचा समावेश होता. आम्ही ऊर्जा रणनीती भागीदारी, व्यवसाय आणि जनता ते जनता यांच्यातील संबंधावर चर्चा केली. संरक्षण क्षेत्रात भारत-अमेरिका दरम्यान मजबूत नाते आमच्या भागीदारीचा महत्त्वपूर्ण पक्ष आहे. ट्रम्प यांनी दहशतवादाचा उल्लेख करताना म्हटले की, पंतप्रधान मोदी आणि मी आपल्या नागरिकांना कट्टर इस्लामी दहशतवादापासून वाचवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. अमेरिका पाकिस्तानच्या जमिनीवरुन दहशतवाद रोखण्यासाठी पाऊल उचलत आहेत. अमेरिकेसोबतच्या 3 अब्ज डॉलर्सच्या सुरक्षा करारावरील सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. या करारांतर्गत भारताला अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसहित आपाचे आणि एमएच-60 रोमियो हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सदेखील मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली. नव्या शस्त्रास्त्रांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या खरेदीनंतर भारताचं बळ वाढणार आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान असलेले चांगले संबंध हे दोन्ही देशांच्या सरकारमधील नाही तर दोन्ही देशांच्या नागरिकांमधील आहेत, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. भारतीय पाहुणचाराने मी भारावून गेलो आहे. इथला भव्य दिव्य स्वागत समारंभ मी कधीही विसरणार नाही. ताजमहाल येथे दिलेली भेट अविस्मरणीय होती. पुढील काळात भारतासोबतचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी उत्तम प्रयत्न केले आहेत. आज आम्ही संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि व्यापार यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. दरम्यान, अमेरिकेच्या प्रथम महिला मिलेनिया ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि यांच्या पत्नी यांनी मंगळवारी नानाकपुरा येथे सर्वोदय उच्च माध्यमिक शाळेत भेट दिली. मिलेनिया ट्रम्प यांचे पारंपारिक पद्धतीने कुंकू लावून स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिलेनिया ट्रम्प यांनी शाळेतील विधार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला आणि आत्मीयतेने विचारपूस केली. यावेळी मिलेनिया ट्रम्प यांचे लहान मुलींनी ग्रीटिंग भेट देऊन स्वागत केले. यावेळी मिलेनिया ट्रम्प यांचे लहान मुलींनी ग्रीटिंग भेट देऊन स्वागत केले. शाळेतील मुलांनी मिलेनिया ट्रम्प यांच्यासमोर पारंपरिक वेशभूषा घालून सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. मिलेनिया ट्रम्प यांनीसुद्धा शाळेतील मुलांसोबत आनंद साजरा केला आणि त्यांचे कौतुक केले.