Breaking News

दिल्लीतील हिसांचार रोखण्यात अपयश


देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न अलीकडच्या काही दिवसांत निर्माण झाला आहे. दिल्ली ही भारताची राजधानी चार दिवसांपासून जळत आहे, तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील केंद्र सरकारकडून कोणत्याही तात्काळ उपाययोजना केलेल्या नाहीत. दिल्लीसारख्या संवदेनशील भागात इतक्या मोठया प्रमाणात दगड आले कुठून. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे कुणाचे षडयंत्र आहे. कारण आंदोलक इतक्या मोठया प्रमाणावर हिंसाचार करू शकत नाही. मग आंदोलकांच्या नावाखाली हिंसाचार करणारे भाडोत्री गुंड कुणी आणले, याचा तपास लागण्याची गरज आहे. दिल्लीमध्ये चार-पाच दिवसांपासून हिंसाचार घडत असतांना, पोलिस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत, असा सवाल निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. दिल्लीतील हिंसाचाराची दृश्ये पाहिली तर लक्षात येते की आंदोलनकर्त्यांनी पोलीस चौकीच्या जवळच असलेल्या दर्ग्याला आग लावली. अन्य फोटोंमध्ये पेट्रोल पंप, अनेक गाड्या, दुकाने तसेच अनेक घरेही जाळण्यात आली. जाफ्राबादमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन तीव्र होऊ शकते याचा अंदाज दिल्ली पोलिसांना आला नाही का? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दिल्ली या राज्याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अस्तित्वात असली, तरी पोलिस हा दिल्ली राज्याचा विषय नाही.  मात्र दिल्ली पोलीस याला अपवाद आहेत. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. बाकी राज्यांमध्ये पोलीस मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. मात्र दिल्लीत असे नाही. पोलीस हा सरकारचा अविभाज्य भाग आहे. पोलिसांनी योग्यवेळी कारवाई करावी अशी अपेक्षा केली जाते जेणेकरून दंगली-हिंसाचार रोखला जावा. पोलीस कारवाई का करत नाहीत हे समजत नाही. पोलिसांना कोणी रोखलं आहे का? त्यांचे हात-पाय बांधून ठेवले आहेत का? कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांवर बंदी नसेल आणि तरीही ते कृती करत नसतील तर ही गंभीर गोष्ट आहे. कोणी पोलिसांना रोखलं नसेल आणि तरीही ते काहीही करत नसतील तर ही आणखी गंभीर गोष्ट आहे. पोलिसांची कारवाई दोन प्रकारची असते- एक प्रतिबंधात्मक, दुसरी रिअ‍ॅक्टिव्ह रिअ‍ॅक्टिव्ह प्रकारात घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. तक्रार लिहून घेतल्यानंतर कारवाईला सुरूवात होते. प्रतिबंधात्मक प्रकारात गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गोष्टी हाताबाहेर जाऊ नयेत म्हणून वेळेआधीच खबरदारीचा उपाय केला जातो. दिल्लीच्या बाबतीत प्रतिबंधात्मक कारवाई कमी पडली आहे. रिअ‍ॅक्टिव्ह पोलिसिंगही कमी पडलं आहे. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांच्या कृतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे, त्यातून मोठया प्रमाणावर त्रुटी दिसून येत आहे. दिल्लीमध्ये इतक्या मोठया प्रमाणावर हिंसाचार घडत असतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय करत होते. याप्रकरणी काँगे्रसने अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दिल्लीतील हिंसाचार हे एक षडयंत्र आहे. भाजपकडून हिंसा भडकविली गेली.भाजप नेत्यांवर कारवाई न केल्याने हिंसा झाली आहे. ईशान्य दिल्लीमध्ये हिंसा पसरली आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेस पक्ष मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांसोबत आहे. दिल्ली हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार आणि गृहमंत्री जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधींनी केली. याशिवाय दिल्लीतील केजरीवाल सरकारने योग्यरित्या हिंसाचार हाताळला नाही, असाही आरोप करण्यात आला आहे. तसेच काँगे्रसकडून पाच प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. रविवार पासून गृहमंत्री कुठे होते आणि काय करत होते? दिल्लीचे मुख्यमंत्री कुठे होते? सुरक्षा यंत्रणा कुठे होत्या? दिल्ली पोलिसांनी वेळीच उपाय का केले नाहीत? संसदीय फोर्सला का बोलावले नाही?असे पाच प्रश्‍न काँगे्रसकडून उपस्थित करण्यात आले आहेत. अर्थात  दिल्लीतील हिसांचाराच्या वेळी राजकारण करण्याची आवश्यकता नाही. हिसांचार थांबवण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र अशावेळी सत्ताधारी भाजपने देखील कृती करण्याची गरज आहे. अनेकांचा हकनाक जीव जात आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. त्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. रजधानी दिल्लीतल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शांतता आणि सौहार्द हा आमच्या मुलभूत धोरणांचा भाग आहे. दिल्लीच्या बंधू आणि भगिनींनी शांतता राखावी असं आवाहनही पंतप्रधानांनी केले. मात्र केवळ आवाहन करून, शांतता प्रस्थापित होणार नाही. त्यासाठी कृती करण्याची गरज आहे. जाळपोळ घडवून आणणारे कोण आहेत. उत्तरप्रदेशातील हिसांचारानंतर दिल्लीमध्ये घडलेला हिसांचार हा भाजपसाठी मोठी नामुष्की आहे.  ईशान्य दिल्लीतील चार विभागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून आंदोलकांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत वीस जणांचा बळी गेला असून, 56 पोलिस कर्मचार्‍यांसह दोनशे लोक जखमी झाले आहेत. जाफराबाद-मौजपूर-सीलमपूर-गोकूळपुरी, कबीरनगर, कर्दमपूर या टप्प्यातील ब्रह्मपुरी, मौजपूर भागांत जाळपोळ, लुटालूट व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर नागरिकांनी आंदोलन केले. पहाटे साडेतीनच्या सुमारास पाण्याचा मारा करून आंदोलकांना पांगविण्यात आले. केजरीवाल यांनी म्हटले आहे, की दिल्लीतील परिस्थिती चिंताजनक आहे. पोलिस सर्व प्रयत्न करूनही स्थिती नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरत आहे. लष्काराला बोलावून दंगलप्रभावित भागांमध्ये संचारबंदी लागू केली पाहिजे. केंद्र सरकारकडून आश्‍वासक उपाययोजना केल्यास, हा हिसांचार काही तासांत आटोक्यात येऊ शकतो. मात्र सर्व काही केंद्र सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.