Breaking News

‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली :- ‘कदाचित अजूनही’ या मराठी काव्य संग्रहासाठी प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमीच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्काराच्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळयाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी, लेखक, दिग्दर्शक गुलजार उपस्थित होते. यावेळी श्रीमती पाटील यांना साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार आणि उपाध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते मराठी भाषेतील उत्कृष्ट लेखनासाठी साहित्य अकादमीचा वर्ष 2019 च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव उपस्थित होते.
अनुराधा पाटील यांचा ‘कदाचित अजूनही’ हा पाचवा काव्यसंग्रह आहे. ‘कदाचित अजूनही’ मध्ये आशय विषयाचे वैविध्य ठळक जाणवते. पर्यावरण, माध्यमे, हिंसा, जगण्यात आलेली आक्रमकता आणि अतिवेग यावर कवितांतून त्यांनी भाष्य केलेले आहे. यातील ‘हरेक क्षण अदृश्य सोबत करणार्‍या मृत्यूबाबत. . ‘आतल्या काळोखात पाकळी पाकळीनं उमलत गेलेला मृत्यू..’, ‘हजारो पाकळ्यांचं काळं कमळ..’ या कविता आत्मविश्‍लेषण करायला लावतात.