Breaking News

भगवान गडावरुन बंदुकीचा सांगाडा, तलवार चोरीस तीन जण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद


पाथर्डी/प्रतिनिधी ः
श्रीक्षेत्र भगवान गडावरील महंत भगवानबाबांच्या वस्तू संग्रहालयातील एका जुन्या बंदुकीचा सांगाडा व एक जुनी तलवार तिघांनी चोरुन नेली. गुरुवारी (दि.27) सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात गडाचे विश्‍वस्त जगन्नाथ बटुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
              याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संग्रहालयाचे दरवाजे बंद करण्यात आले. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास गडाच्या सेवकांना भगवानबाबा यांच्या वस्तूसंग्रहालयाचे कडीकोयंडे आणि कुलूप तोडलेले दिसले. महंत भगवान बाबांच्या समाधी मंदिराच्या दक्षिणेकडील गेटचेही कुलुप तोडलेले लक्षात आले. या ठिकाणी जाऊन खात्री केली असता महंत भगवानबाबांच्या वस्तू संग्रहालयाचा दरवाजा तोडून संग्रहालयातील एक जुन्या बंदुकीचा सांगाडा आणि एक जुनी तलवार जागेवर नव्हती. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये तीन जण मोटरसायकलवर दिसत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार सुरेश बाबर करत आहेत.