Breaking News

‘कोरोना’च्या दहशतीने शेअर बाजार कोसळला गुंतवणूकदारांचे जवळपास दोन लाख कोटींचे नुकसान


मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात स्वागत होत असताना शेअर बाजारात चौफेर विक्री सुरु होती. दिवसअखेर सेन्सेक्स 806 अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास दोन लाख कोटींचे नुकसान झाले. सोमवार सकाळपासून गुंतवणूकदारांनी सर्वच क्षेत्रात विक्रीचा सपाटा लावला. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समध्ये 800 हून अधिक अंकांची घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स 40363 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 251 अंकांनी घसरून 11 हजार 829 अंकांवर बंद झाला. आजच्या सत्रात इन्फोसिस, कोटक बँक, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, एलअँडटी, रिलायन्स, हिरोमोटो कॉर्प, ऍक्सिस बँक, टीसीएस, एसबीआय यासारखे प्रमुख शेअरमध्ये मोठी घसरण झाली. चीनमधील करोना व्हायरस आता इतर आशियाई देशांमध्ये पसरू लागल्याने आशियातील अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. याचा जगभरातील गुंतवणूकदारांनी धसका घेतला आहे. चीन पाठोपाठ आता दक्षिण कोरियात करोना व्हायरसने 7 जणांचा बळी गेला आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. इटलीमध्ये करोनाचे 152 संशयित रुग्ण आढळले आहेत. इटली पोलिसांकडून करोना संक्रमित परिसरात पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे. करोनाचे पडसाद आशियातील सर्वच प्रमुख बाजारांवर उमटले. हँगसेंग आणि शांघाई निर्देशांक 1.5 टक्क्यांनी कोसळला. युरोपात इटलीचा मुख्य शेअर बाजार असलेला मिलान शेअर निर्देशांक तीन आठवड्याच्या नीचांकी स्तरावर आला.