Breaking News

अहो आश्चर्यम! फक्त अंगठा दिला अन् कर्जमुक्त झालो! कर्जमुक्त शेतकऱ्यांत समाधान


देवळालीप्रवरा / प्रतिनिधी
'साहेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी खूप हेलपाटे मारावे लागले. यावेळी फक्त थम्ब (अंगठा) दिला, अन काम झालं. अगदी सुटसुटीत आहे', अशा समाधानकारक प्रतिक्रिया राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावच्या पोपटराव भानुदास मोकाटे यांनी त्यांची प्रतिक्रिया थेटपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवली.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात आज झाली. प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील याद्यांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातील इतर मंत्री तसेच अधिकारी यांनी त्यातील काही गावांतील पात्र लाभार्थीं यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. जिल्ह्यात दोन लाखापर्यंतचे तब्बल लाख ५७ हजार ७१७ लाभार्थी आहेत. ब्राह्मणी (ता. राहुरी) येथे सकाळी  तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी ९७१ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. येथील शेतकऱ्यांना या संवादाची संधी मिळाली. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुपारी एक वाजता या संवादास सुरुवात केली. राज्यात कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीत प्रथम क्रमांकावर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी त्यांनी सर्वप्रथम संवाद साधला. सुरुवातीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील कोणत्या गावातून आलात, हे विचारले. त्यानंतर पोपटराव मोकाटे यांच्याशी सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. किती कर्ज होते, कशासाठी घेतले होते, अशी विचारणा केली. त्यावर पोपटरावांनी ऊसासाठी २८ हजार रुपये कर्ज घेतले. त्यावरील व्याजासह ३२ हजार रुपये झाल्याचे सांगितले. हे कर्ज माफ होणार असल्याने अतिशय आनंद आहे. प्रशासन आणि सरकारचं खरोखरंच आभार, असे ते म्हणाले. पोपटरावांनी आभार मानताच मुख्यमंत्री  ठाकरे यांनी आभार कसले, हे तर कर्तव्यच असल्याचे सांगितले. तुमचे आभाराचे शब्द म्हणजे आमच्यासाठी आशिर्वाद असल्याची भावना मुख्यमंत्रांनी व्यक्त केली. या संवादासाठी ब्राह्मणी येथील उषाबाई हापसे, मीराबाई हापसे, गणपत जाधव, पोपट मोकाटे, संतोष ठुबे, दिलीप तारडे, राजेंद्र बानकर, पंढरीनाथ बानकर, पोपट ठुबे, भास्कर ठुबे हे पात्र शेतकरी तर जखणगाव येथील रामचंद्र जाधव, बाळू वाळके, पंकज पवार, बंडू वाळके, छाया पवार, अशोक भिसे, विष्णू कर्डिले, बेबी कर्डिले, उमराव शेख, विठ्ठल वाळके आदी उपस्थित होते. सकाळपासून शेतकऱ्यांनी सेतु केंद्रावर कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत ब्राह्मणी येथील २७६ लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करून, कर्जमाफीचा लाभ घेतला.  पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसह सकाळी अकरा वाजता तहसीलदार शेख जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. या कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया जलदगतीने मार्गी लागावी, यासाठी स्वत: जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्वीजय आहेर, सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार, सहकार विभागाचे तालुका सहनिबंधक, गटसचिव, तलाठी, बॅंकांचे अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. ब्राह्मणी  गावांची यादी प्रसिद्धीकरण, आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित तहसीलदार एफ. आर. शेख आणि उमेश पाटील तसेच सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण  झाले.