Breaking News

कोपरगावात मंगळवारी धरणे आंदोलन भाजपचा इशारा शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी ः
राज्यात भाजपचा विश्‍वासघात करून महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे, या शासनाने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप शहर व तालुका भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. या विरोधात भाजपच्या वतीने 25 फेब्रुवारीला कोपरगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ही माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
           कोल्हे म्हणाल्या, अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार, फळबागांसाठी 50 हजार नुकसान भरपाई देऊ, अशी घोषणा शेतकर्‍यांच्या बांधावर जात आताच्या सत्ताधार्‍यांनी केली होती. पण प्रत्यक्षात त्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अद्यापही त्यांना पीकविमा मंजूर झाला नाही. राज्यात महिलांवर अत्याचार वाढत आहेत.   त्यांचे संरक्षण करण्यात महाविकास आघाडी सरकार कुचकामी ठरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांसाठी जलयुक्त शिवार योजना आणली. परंतु हे शासन जलयुक्त शिवार योजना बंद करत आहे. निळवंडे धरण पूर्ण झाले,  परंतु कालव्यांची कामे तशीच रखडली आहेत.
  ती तात्काळ पूर्ण करावी. कोपरगाव  शहराला निळवंडे, शिर्डी पिण्याच्या पाण्याची योजना बंद पाईपलाईनमधून मंजूर केली आहे. ती योजना कार्यान्वित करावी. त्याचबरोबर 2014 ते 2019 या पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची असंख्य विकास कामे आपण मंजूर करून घेतली आहेत. परंतु ती जाणून बुजून ती केली जात नाही. तेव्हा ही कामे तात्काळ पूर्ण करावी, अशी मागणी आहे, असेही कोल्हे म्हणाल्या.
   महाविकास आघाडीच्या विरोधात 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते तीन या वेळेत धरणे आंदोलन करून त्याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन रवींद्र बोरावके, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष कैलास खैरे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी केले आहे.