Breaking News

मृत जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई

कोपरगाव/ प्रतिनिधी : मागील वर्षी विषबाधेने मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना  आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे धनादेश कोपरगाव पंचायत समितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले आहे. 
2019 पासून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांना विषबाधा होऊन किंवा जनावराचा अकस्मात मृत्यू झाल्यास त्या जनावरांच्या मालकांना प्रती रुपये पाच हजार नुकसान भरपाई देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी पाठपुरावा केल्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. 
यावेळी आमदार काळे म्हणाले, “शेतकर्‍यांना मदतीचा हात मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाने सुरु केलेली योजना अतिशय स्तुत्य आहे. शेतकर्‍यांच्या हिताचा असा उपक्रम राबविणारी नगर जिल्हा परिषद राज्यात एकमेव आहे. या योजनेंतर्गत एकाच वेळी चार जनावरांचा मृत्यू झाला तरी चार जनावरांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. ज्या शेतकर्‍यांच्या जनावरांचा अशा प्रकारे अकस्मात मृत्यू होईल त्या शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कारभारी आगवण, मधुकर टेके, श्रावण आसने, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप दहे, देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख, प्रसाद साबळे, राहुल जगधने, सांडूभाई सय्यद तसेच लाभार्थी उपस्थित होते.