Breaking News

गावठी कट्टा, सहा काडतुसे जप्त सुपा येथे कट्टा खरेदी करणार्‍या तिघांना अटक


पारनेर/ प्रतिनिधी ः
 तालुक्यातील सुपा येथे गावठी कट्ट्याची खरेदी-विक्री करताना पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली .गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
 दि. 13 रोजी दुपारी बाराच्या दरम्यान पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना माहिती मिळाली की संतोष भगवान शिंदे (राहणार हंगा, ता. पारनेर)  हा निळ्या रंगाच्या बुलेटवर गावठी कट्टा विक्री करण्यासाठी शहापूर चौकात येणार आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा विकत घेण्याकरिता काहीजण येणार आहेत. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह पोलिस पथकाने सापळा लावून संतोष भगवान शिंदे याच्याकडून गावठी कट्टा घेण्यासाठी आलेले विष्णू नामदेव कोतवाड (वय 31,  राहणार हनुमान टेकडी, अहमदपूर,  जि.  लातूर ), सुदर्शन युवराज सब्दे (वय 32, राहणार टेंभुर्णी, जि. लातूर)  यांना पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.  त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसे मिळाली. महिंद्रा कंपनीची गाडी, बुलेट यासह सहा लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार बाबासाहेब अकोलकर करत आहेत. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले, सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम काळे, बाबासाहेब अकोलकर, अमोल धामणे, कल्याण लगड, यशवंत ठोंबरे सहभागी झाले होते.