Breaking News

'इये अहमदनगरी' गायी भंगार खाऊनि मरती ; आन कत्तलखाने जोमात चालती!


balasaheb shete patil / mo. 7028351747 
गाय म्हणा, गोमाता म्हणा किंवा पाळीव प्राणी म्हणा. तो जर कचराकुंडीवर कागद, खिळे, तारा, प्लास्टिक आदी भंगार खाऊन शहर आणि परिसरात हिंडत असेल, पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती कमी होऊन मरत असेल तर ही बाब कोणत्या तरी शहराला भूषणावह आहे का?  मात्र  ऐतिहासिक, पौराणिक अशी पार्श्वभूमी असलेल्या या अहमदनगर शहरात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून गायी, वासरे आणि अन्य प्राणी मोकाटपणे कचराकुंडीवर पोटातल्या भुकेची आग शमवित आहेत. भुकेच्या तडाख्यात काय काय पोटात जातंय, याची या मुक्या प्राण्यांना पुसटशीही कल्पना नसते. मात्र भल्या पहाटेच चरायला सोडलेली ही जनावरे दिवसभर काहीही खातात आणि रात्री उशिरा कोणीतरी या जनावरांना एक टेम्पोत घालून कत्तलखान्यात नेत असते. फक्त दिसायलाच धष्टपुष्ट अशी ही जनावरे कापली जातात. जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच एका नालीवाटे रक्ताचं लाल पाणी वाहत असते. या साऱ्या पार्श्वभूमीवर एकच प्रश्न अनुत्तरित राहतो, या ऐतिहासिक आणि पौराणिक अहमदनगर शहरात सुरु असलेली गोमातेची कत्तल केव्हा बंद होईल?
जिल्हाच नव्हे तर राज्याला आणि देशाला बीफ आणि गोमांस या धंद्यातून कित्येक कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जागतिक बाजारपेठेत या धंद्याची मोठी चलती आहे.  केंद्रात कोणाचे सरकार सत्तेवर आले, यामुळे या धंद्यावर काहीच फरक पडत नाही,  हे गेल्या पाच वर्षांपूर्वीच स्पष्ट झाले आहे. स्लाटर हाऊस किंवा कत्तलखान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची काय नियमावली आहे, या नियमावलीचे पालन या शहरातील कत्तलखान्याचे चालक करतात का, किंवा या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कत्तलखान्यांच्या मालकांविरुद्ध जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनाने आतापर्यंत काय कारवाई केली, हा मुद्दा तसा संशोधनाचा आहे. मात्र इच्छशक्तीचा अभाव, ‘मी, माझे आणि मला काय त्याचे’ ही स्वार्थी वृत्ती, प्रशासकीय अधिकाऱ्यांची कमालीची उदासीनता, सामाजिक संघटनांची मुस्कटदाबी अशा नैराश्यपूर्ण वातावरणात गोमातेची कत्तल आणि यातून कोट्यवधींची कमाई अविरतपणे सुरूच राहते की काय, अशीच परिस्थिती आज निदर्शनास येत आहेनाही म्हणायला महापालिकेच्या कोंडवाड्यात आजमितीला ३६ जनावरे आहेत. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था उत्तमप्रकारे ठेवली जात असल्याचा दावा मनपा प्रशासन करते. मात्र तरीही खंडीभर किंबहुना त्याहून अधिक गायी, बैल मोकाटपणे हिंडत आहेत. या जनावरांमुळे रहदारीला अडथळा होत आहे. ही जनावरे रस्त्यातच ठाण मांडून बसत कधी अघोषित रास्तारोको करतील, याचा काहीही नेम राहिलेला नाही. प्रश्न असा आहे, की जर महापालिकेचा कोंडवाडा अद्ययावत आहे, तेथे या जनावरांची चांगली सोया आहे, तर मग बाकीची ही खंडीभर किंवा त्यापेक्षा अधिकशी जनावरे रस्त्यावर का हिंडत आहेत? महापालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक, जबाबदार नागरिक आणि मनपाचा अतिरिक्त कारभार पाहणारे आयुक्त तथा जिल्हाधिकारी या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देतील का?