Breaking News

पुलवामाच्या सैनिकांना अभिवादन करत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे' जागरूक नागरिक मंचचा पुढाकार


अहमदनगर / प्रतिनिधी
आजच्या 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त माणसामाणसांमध्ये बंधुभाव, आपुलकी आणि प्रेम भावना जागृत व्हावी, यासाठी येथील जागरूक नागरिक मंचच्यावतीने  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून समस्त जनतेच्यावतीने गुलाबपुष्प व्हॅलेंटाईन पत्र देऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये वीर मरण आलेल्या जांबाज सैनिकांना अभिवादन करण्यात आले. 
याप्रसंगी बोलतांना जागरूक नागरिक मंचचे सुहास मुळे म्हणाले, आज देशभर जी गोंधळाची जातीपाती मध्ये विष पेरले जात असल्याची परिस्थिती निर्माण होते आहे, त्यात भर म्हणून नवीन पिढी इतिहासातून काही चांगले शिकण्याऐवजी, त्या इतिहासामध्ये काही तोडफोड करता येते का? किंवा कुठल्या जातीला त्या कथानकामधून टारगेट करता येते का, याचाच विषारी शोध लावत आहे. शतकानुशतकं अठरापगड जातीला घेऊन गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या देशामध्ये अतिशय वाईट वातावरण निर्माण करण्यामध्ये काही लोक धन्यता मानत आहेत. वास्तविक इतिहास यासाठी अभ्यासायचा असतो की त्यातील चुका पुन्हा होऊ नयेत. परंतु आज-काल इतिहास यासाठी अभ्यासला किंवा अवडंबर करून दाखवला जातो आहे, की त्यातून जातीपातींना काही वाईट पद्धतीने टार्गेट करता येईल का? आपल्या देशाचे संविधान घटना कायदेकानून, प्रशासन, आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी, आणि कर्तव्य यावर जर आपण निष्ठेने प्रेम केले, तर आपला देश निश्चितच संपूर्ण जगाचा दीपस्तंभ ठरेल, असा संदेश जायला हवा. त्यासाठी प्रेम हा शब्द फक्त स्त्री-पुरुषां पुरता मर्यादित ठेवता त्याला विशाल स्वरूप देणे गरजेचे आहे. म्हणून दिल्लीगेट येथे सर्वधर्मिय बांधवाच्या प्रेमाचा, बंधुभावाचा फलक लाऊन सर्वधर्मियांनी एकमेकाला गुलाबपुष्प देऊन पुलवामा हल्ल्यात देशाची एकता अखंडता वाचवण्यासाठी शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यात आला.
दरम्यान या कार्यक्रमाला विविध धर्मियांचे प्रतिनिधी म्हणून जागरूक नागरिक मंचाचे सदस्य अब्दुल्लाखान,अजितसिंग वधवा, याकूब खान, भैरवनाथ खंडागळे, हरिभाऊ डोळसे, योगेश गंडले, रवींद्र देवळालीकर, कैलास दळवी, सुनील कुलकर्णी, सुनील पंडित, जया मुनोत, धणेश बोगावत, राजू पाटोळे, राहुल कुलकर्णी, अतुल पिंपळकर, राजेश सटाणकर, संध्या मेढे, निर्मला भंडारी, सुरेखा सांगळे, शारदा होशिंग, रेखा जरे आदी नागरिक आवर्जून उपस्थित होते.