Breaking News

गवत कापल्याच्या कारणातून महिलांना मारहाण ब्राम्हणी येथील प्रकार ः तिघांवर गुन्हा दाखल


राहुरी/शहर प्रतिनिधी ः
गवत कापल्याच्या कारणातून तीन जणांनी महिलांना कंबरेचा पट्टा आणि चप्पलने मारहाण केल्याची घटना ब्राम्हणी येथे घडली.
        सिंधूबाई लहानू नेटके, चंदाबाई बनसोडे, मंगल अडागळे, कुसूमबाई अडागळे, अंबिका अडागळे, संगीता ससाणे, सुनीता दत्तात्रय वैरागर, सुनीता ज्ञानेश्‍वर वैरागर, शांता गायकवाड, सविता साठे, कला वाघमारे, मनीषा वैरागर (सर्व राहणार ब्राम्हणी, ता. राहुरी) या महिला 24 फेब्रुवारी रोजी दिलीप शिवाजी गायकवाड यांच्या शेतात कांदा खुरपणीसाठी गेल्या होत्या.
 त्यावेळी दिलीप गायकवाड हे महिलांना म्हणाले, माझ्या शेताशेजारी बांधाच्या कडेला गिन्नी गवत आहे. मला त्याची गरज नाही. तुमच्या जनावरांसाठी हे गवत कापून घेऊन जा. यानंतर या महिला हे गवत कापण्यासाठी दिलीप गायकवाड यांच्या शेतात गेल्या. त्या गवत कापू लागल्या असता तेथे महेश मच्छिंद्र गायकवाड व गणेश मच्छिंद्र गायकवाड हे दोघे आले. त्यांनी हे शेत आपले असल्याचे म्हणत या महिलांना गिन्नी गवत कापण्यास विरोध केला. यावर महिलांनी हे गवत कापण्यास दिलीप गायकवाड यांनी सांगितल्याचे म्हटले.
यानंतर झालेल्या वादात महेश गायकवाड याने कंबरेचा पट्टा काढून या महिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मच्छिंद्र बाबूराव गायकवाड यालाही फोन करून बोलावून घेण्यात आले. मच्छिंद्र गायकवाड तेथे आला आणि त्यानेही पायातील चप्पल काढून महिलांना मारहाण केली. तसेच या दोघांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकीही दिली, असे या महिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सिंधूबाई लहानू नेटके या महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत मच्छिंद्र बाबूराव गायकवाड, महेश मच्छिंद्र गायकवाड व गणेश मच्छिंद्र गायकवाड या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास श्रीरामपूर विभागाचे उपाधीक्षक  राहुल मदने करत आहेत.