Breaking News

पती-पत्नीची बदली एकाच ठिकाणी करावी आमदार रोहित पवार यांची मागणी


कर्जत/प्रतिनिधी ः
नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्‍या पती-पत्नीची एकाच ठिकाणी बदली करण्यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्नशील आहेत. याबाबत त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक दाम्पत्य हे गेल्या 10-15 वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अध्यापनाचे काम करत आहेत. कुटुंबापासून शेकडो किलोमीटर अंतरावर काम करत असताना त्यांना अनेक कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागते.
कुटुंबाची हेळसांड झाल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची अडचण होते. कुटुंबातील सर्वच नियोजन कोलमडून जाते. शेकडो किलोमीटर अंतराच्या प्रवासाने कौटुंबिक स्वास्थ्यावरही विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीला एकत्रित राहता यावे यासाठी त्यांची प्राधान्याने बदली करण्याचा निर्णय सप्टेंबर 2011 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. परंतु भाजप सरकारने एप्रिल 2017 मध्ये बदल्यांच्या प्राधान्यक्रमात पुन्हा बदल केला. त्याचा शिक्षकांच्या कुटुंबावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे, असे आमदार रोहित पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.
बदल्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये शिक्षक पती-पत्नीला पूर्वीप्रमाणे प्राधान्य देण्यात येईल. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले.