Breaking News

गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज

अर्थमंत्र्यांची घोषणा ; शेतकर्‍यांना मिळणार दोन हजार रुपये 
नवी दिल्ली : करोनामुळे संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळित झाले असून, हातावर पोट असणार्‍या कामगार, गोर-गरिबांचे मोठे हाल होत असल्यामुळे गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे बूस्टर पॅकेज गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. 
सध्या आरोग्यक्षेत्रातील कर्मचारी झोकून देऊन काम करत आहेत. या क्षेत्रात काम करत असलेल्यांचा 50 लाख रुपयांचा जीवन विमा उतरवला जाणार आहे. 20 लाख कर्मचार्‍यांना विम्याचा लाभ मिळणार आहे. अंगणवाडी सेविका (आशाताई), स्वच्छता कर्मचारी यांनाही विम्याचे संरक्षण दिले जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत 80 कोटी नागरिक निश्‍चित करण्यात आले आहेत. एकाही व्यक्तीला उपाशी झोपू दिले जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीला अतिरिक्त 5 किलो तांदूळ किंवा गहू तीन महिन्यांपर्यंत मोफत दिले जातील. हे अतिरिक्त लाभ मोफत असतील. गहू आणि तांदळाबरोबर एक किलो डाळही दिली जाणार आहे.  रोख पैसे हस्तांतराबाबत 8 मोठ्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. यात शेतकरी, मनरेगा मजूर, गरीब विधवा, गरीब दिव्यांग आणि गरीब पेन्शनधारक, जनधन योजना, उज्ज्वला योजनेचे लाभार्थी, महिलांचे स्वयं सहायत्ता समूह, संघटित क्षेत्राचे कर्मचारी आणि बांधकाम क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांसाठी ही घोषणा करण्यात आली आहे.  पंतप्रधान किसान योजना, किसान सन्मान निधीचा फायदा 8 कोटी 70 लाख शेतकर्‍यांना मिळेल. 2 हजाराचा हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित केला जाईल.  मनरेगा मजुरांची दैनिक मजुरी 182 वरुन 202 रुपये करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विधवांना तीन महिन्यांपर्यंत अतिरिक्त 1 हजार रुपये दिले जातील. ही रक्कम दोन हप्त्यात दिली जाईल. 3 कोटी लोकांना याचा लाभ मिळेल. करोनामुळे देशातील असंघटित, हातावर पोट असणारा, वयोवृद्ध आणि इतर क्षेत्रातील लोकांच्या उदरर्निवाहाचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. सरकारनं तातडीनं मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेससह सर्वच पक्षांनी केली होती. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. यात देशातील शेतकर्‍यांनाही दिलासा देण्यात आला आहे. सीतारामन म्हणाल्या की, ‘देशातील इतर घटकांप्रमाणेच शेतकर्‍यांच्या संदर्भातही सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील 8 कोटी 70 लाख शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेतून सरकारनं शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. त्यातून पहिला हप्ता दोन हजार रुपये तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत,’ अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना मोफत सिलिंडर
उज्ज्वला योजनेंतर्गत 8 कोटी महिलांना मोफत सिलिंडर देण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात पुढील तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रूपये सरकारकडून भरण्यात येणार आहेत. यामुळे 20 कोटी महिलांना लाभ मिळणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
तीन महिने 5 किलो गहू, तांदूळ मिळणार मोफत
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. गरिब जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आता सरकारने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक पॅकेजची घोषणा केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरिबाला पुढील तीन महिने प्रत्येकी पाच किलो तांदूळ किंवा गहू मोफत दिले जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळ दिली जाणार आहे.