Breaking News

उन्नाव हत्येप्रकरणी कुलदीपसिंह सेनगरला 10 वर्षांची शिक्षा


नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची हत्या केल्या प्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने भाजपमधून निलंबित करण्यात आलेला उत्तर प्रदेशमधील माजी आमदार कुलदीपसिंह सेनगर आणि अन्य सहा आरोपींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली. याच प्रकरणात कुलदीपसिंह सेनगर आणि त्याचा भाऊ जयदीप ऊर्फ अतुलसिंह सेनगर यांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. जून 2017 मध्ये कुलदीपसिंह सेनगर याने उन्नावमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपींनी तिच्या वडिलांची हत्या केली होती. याच प्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने सात जणांना बुधवारी दोषी ठरविले होते. त्यांना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. डिसेंबर 2019 मध्ये दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने कुलदीप सिंह सेनगरला तुरुंगात पाठविण्याचे आदेश दिले. गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशमधील विधानसभेतून त्याला निलंबित करण्यात आले.दिल्लीतील न्यायालयाने हत्ये प्रकरणी शिक्षा सुनावलेल्यांमध्ये कुलदीपसिंह सेनगर, त्याचा भाऊ जयदीप यांच्यासह दोन पोलिस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.