Breaking News

कोरोनाचा फटका ; गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी बुडाले सेन्सेक्स तब्बल 2800 अंकांनी कोसळला


मुंबई : कोरोना बाधितांची संख्या जगभरात वाढत आहे. सुमारे शंभर देशात कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. भारतात जवळपास 67 रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात  
आतापर्यंत 10 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा परिणाम अर्थिक आघाडीवरही दिसू लागला आहे. गुरुवारी शेअर बाजारात झालेल्या घडामोडीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 11 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
जगातील सर्वच महत्त्वाच्या शेअर बाजारांच्या निर्देशांकात पडझड झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात गुरुवारी सकाळी मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक
तब्बल 2800 अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीमध्येही 500 अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ’करोना’च्या भीतीने गाळण उडालेल्या गुंतवणूकदारांनी बाजार उघडताच जोरदार  
विक्री केली. यात सेन्सेक्स तब्बल 2700 अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 780 अंकांनी घसरून 9 हजार 600 अंकांपर्यंत खाली आला आहे. दीड तासांत गुंतवणूकदारांना सुमारे 11 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आजच्या सत्रात सर्वच क्षेत्रांमध्ये धूळधाण उडाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावरील एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि एचडीएफसी या पाच शेअरने सेन्सेक्सच्या कोसळण्यात 700 अंकांचा हातभार लावला. 1700 शेअर्सपैकी केवळ 160 शेअर्स तेजीत आहेत. निम्म्याहून अधिक शेअर्सनी सार्वकालीन नीचांकी स्तर गाठला आहे. सध्या सेन्सेक्स 2600 अंकांच्या घसरणीसह 33000 अंकांपर्यंत खाली आला आहे. निफ्टी 727 अंकांच्या घसरणीसह 9731 अंकांवर आहे. हवाई सेवा देणार्‍या कंपन्यांच्या शेअरला मोठी झळ बसली आहे. इंटरग्लोब एव्हिएशन आणि स्पाइस जेट हे शेअरमध्ये मोठी घसरण झाली. स्पाइस जेट 19 टक्क्यांनी घसरला. धातू उद्योगाला करोनाचा जबर फटका बसणार आहे. त्यामुळं धातू उद्योगाशी संबंधित शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. जिंदाल स्टील आणि वेदांता 10 टक्क्यांनी घसरले. आजच्या पडझडीचे परिणाम चलन बाजारावरदेखील दिसून आले. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 64 पैशानी घसरला आहे. सध्या तो 72.28 वर ट्रेड करत आहे. सोमवारी सेन्सेक्स 1900 अंकांनी कोसळला होता. मात्र बुधवारी त्यात तेजी दिसून आली. आशियातील सकारात्मक वातावरणाने भांडवली बाजार सावरले होते. करोना व्हायरस आणि खनिज तेल घसरणीच्या धक्क्यातून सावरलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशनाकाने बुधवारी तेजीची वाट धरली. गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीचा ओघ वाढवला आणि सेन्सेक्स दुपारी 340 अंकांनी वधारला होता. यामुळे सोमवारी झालेल्या नुकसानीत गुंतवणूकदारांची काही प्रमाणात भरपाई झाली होती. शेअर बाजारांचा अशा प्रकारे धुव्वा उडाल्यामुळे गुंतवणूकदारांचे सहा लाख 84 हजार 277.65 कोटी रुपये बुडाले. त्यातच गेल्या आठवड्यात, शुक्रवारीदेखील गुंतवणूकदारांचे तीन लाख 28 हजार 684.50 कोटी रुपये बुडाले. शुक्रवारी सेन्सेक्स 893.99 अंकांनी तर निफ्टी 279.55 अंकांनी गडगडला होता. शेअर बाजारात व्यवहार करणार्‍यांना जागतिक स्तरावरील मंदीच्या भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे दोन्ही भांडवल बाजारांप्रमाणे जगभरातील बांडवल बाजारांतही विक्रीचा प्रचंड ओघ सुरू आहे.