Breaking News

राज्यात ‘करोना’चा पहिला बळी देशभरात 125 जणांना तर महाराष्ट्रात 39 जणांना लागण


मुंबई : कर्नाटक, दिल्लीतनंतर आता महाराष्ट्रात करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा हा भारतातील तिसरा मृत्यू असून, महाराष्ट्रातील पहिला बळी आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात मृत्यू झालेला संबंधित रुग्ण हा 65 वर्षांचा होता. या संदर्भातील माहितीला मुंबई महापालिकेने दुजोरा दिला आहे. या रुग्णाला आधीपासून मधुमेह आणि इतरही काही आजार होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे महाराष्ट्रात मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे. कस्तुरबा रुग्णालयातील इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेला हा देशातील तिसरा रुग्ण आहे. या आधी कर्नाटकमधील एका आणि दिल्लीतील एका रुग्णाचा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला होता. मंगळवारी मुंबईत मृत पावलेली वृद्ध व्यक्ती दुबईहून आली होती. तिथून आल्यावर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसली होती. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 जानेवारीपासून आत्तापर्यंत 2 लाख 46 हजार 843 प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये करोना संशयित असलेल्या 498 रुग्णांची पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये 452 जणांना करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील सहा आणि मुंबईबाहेरील आठ जण करोना ’पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. यामध्ये रविवारी तपासणी झालेल्या संशयितांचे हवाल सोमवारी आले असून भांडुपमधील एक, कल्याणचे दोन आणि नवी मुंबईतील दोन संशयितांच्या चाचण्या ’पॉझेटिव्ह’ आल्या आहेत. नवी मुंबईतील दोन रुग्ण 42 आणि 47 वर्षीय असून हे रुग्ण 14 मार्च रोजी निदान झालेल्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आले होते. भांडुपचा रुग्ण पोर्तुगाल येथून 13 मार्च रोजी मुंबईत आला होता. सोमवारी सायंकाळी 6.30 पर्यंत आलेल्या करोना संशयितांच्या 20 पैकी 20 चाचण्या निगेटिव्ह’ आल्या असून 24 जणांच्या चाचण्यांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.