Breaking News

कोरोनाचा फटका ; शेअर बाजार कोसळला सेन्सेक्स 1600 अंकांनी, तर निफ्टी 453 अंकांनी घसरला


मुंबई : येस बँकेवर लादण्यात आलेले निर्बंध आणि जगभरात पसरत चाललेल्या करोना व्हायरसचा फटका शेअर बाजारालाही बसला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याच्या भीतीमुळं सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरला आहे. निफ्टी देखील 453 अंकांनी गडगडला आहे.
देशासह एकूणच जगभरात सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम आज बाजार उघडताच पाहायला मिळाला. करोना व्हायरसचं संकट अद्यापही दूर झालेलं नाही. त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. येस बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधांनंतर अद्याप यातून कुठलाही मार्ग निघालेला नाही. गुंतवणूकदार या सगळ्या परिस्थितीकडं बारकाईनं लक्ष ठेवून असून सावधपणे निर्णय घेत आहेत. त्यामुळंच शेअर बाजारात शुक्रवारी असलेले निरुत्साहाचे चित्रच आजही कायम आहे. मुंबई शेअर बाजारात आठवड्यात सुरुवातीलाच पुन्हा पडझड पाहायला मिळाली. सोमवारी बाजार सुरु होताच निर्देशांकात 1129 अंकाची घसरण झाली. शेअर बाजार सुरु होताच निर्देशांकात घसरण होऊन  सेन्सेक्स 36, 445 वर आला. निफ्टीही  घसरून तो 10, 675 वर आला आहे. मुंबई शेअर बाजारात सलग तिसर्‍या आठवड्यात पडझड झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारीदेखील शेअर मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स 1400 अंकानी आपटला होता.  आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्यही घसरले तर कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत.