Breaking News

राज्यात एका करोना रुग्णाची प्रकृती चिंताजनक महाराष्ट्रात करोनाचे 17 रुग्ण


मुंबई : झपाट्याने पसरणार्‍या कोरोना विषाणूमुळे जगभरामध्ये भितीचे सावट आहे. अशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत. ’राज्यातील एका वयोवृध्द रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतर सर्व रुग्णांची प्रकृती चांगली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर शाळांच्या सुट्टीबाबत लवकरच निर्णय घेऊ असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना विषाणूसंदर्भात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कोरोना विषाणूमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. सर्वांनी एकत्र येत कोरोनाशी लढा देऊ, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. तसंच, घाबरु नका, सतर्क रहा आणि सरकारला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचे 14 रुग्ण आढळले आहे. पुण्यामध्ये 10, मुंबईत 3, नागपूरमध्ये 1 आणि ठाण्यामध्ये 1 कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. दरम्यान, जर कोरोनाशी संबंधित लक्षणं आढळली तर त्वरीत डॉक्टरांकडे जा. वैयक्तीक स्वच्छता पाळा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. तसंच, परदेशातून आलेल्या नागरिकांशी संपर्क टाळा. सरसकट कोरोनाची टेस्ट करण्याचा आग्रह नको, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. कोरोनाशी लढण्यासाठी राज्यसरकार सतर्क असून रुग्णांची टेस्ट मोफत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, परदेशातून वा संसर्गजन्य भागातून आलेल्या काही रुग्णांकडून रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासंदर्भात सहकार्य मिळत नाही. घरीच थांबून 14 दिवसांनी माहिती देतो, असेही सांगितले जाते. त्यामुळे या अ‍ॅक्टअंतर्गत यंत्रणेला संबधित रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा हक्क असेल. रुग्णहितासाठी या अ‍ॅक्टअंतर्गत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार सरकारकडे राहतो. पण यासंदर्भात केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवर प्राथमिक चर्चा अजून झालेली नाही. साथीचा उद्रेक झाल्यास हा अ‍ॅक्ट लावण्यात येणार आहे. आरोग्यविभागाच्या प्रधान सचिवांसह इतर पाच विभागांचा समन्वय असणारी समिती, राज्यातील नऊ जिल्ह्यांतून करोनाच्या संसर्गाची शक्यता झालेल्या संशयितांना शोधून काढणे, त्यांच्या संपर्कात असलेल्यांची माहिती घेणे, त्याची व्यवस्थित नोंद करणे यासाठी तयार करण्यात आली आहे. तसेच गरज भासल्यास एपिडेमिक अ‍ॅक्टचा वापर करण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. फेब्रुवारी 15 नंतर ज्यांनी जर्मनी, इटली, चीन, इराण, फ्रान्स आणि स्पेन या देशातून प्रवास केला आहे, त्यांना केंद्रसरकारच्या सूचनांनुसार 100 टक्के विलगीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वी आलेल्या प्रवाशांचा अशा प्रकारे पाठपुरावा त्वरित करण्यात आला नव्हता. या विषाणूची लक्षणे त्वरित दिसत नाहीत, असे लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाने सामान्य लोकांनी त्यामध्ये सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सोशल मीडियामुळे करोनाच्या संदर्भामध्ये बरीच चुकीची माहितीही दिली जात आहे. त्यासंदर्भातील तक्रारीही सरकारकडे आल्या आहेत, तसेच शहानिशा करून कारवाईची प्रक्रियाही सुरू झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर मास्क तसेच सॅनिटायझरच्या वापरासंदर्भात लोकांनी सतत आग्रही राहू नये, हातरुमाल आणि साबण या दोहोंचा वापरही तितकाच प्रभावी आहे. आजारावर मात करण्यासाठी लोकशिक्षण योग्य प्रकारे व्हायला हवे, ते करण्यासाठी सरकार आग्रही असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.