Breaking News

करोना रुग्णांमुळे भारतासाठी पुढील 2 आठवडे आव्हानात्मक

नवी दिल्ली : भारतासारख्या अवाढ्यव देशात कोरोना विषाणूचा फैलाव स्थानिक जनतेत झाला तर तो थोपवणे प्रचंड अवघड होण्याची शक्यता आहे. इटली, स्पेन, अमेरिका, इराण येथे तिसर्या आठवड्यात व त्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली व तेथे दररोज शेकडोने मृत्युमुखी पडू लागले आहेत. भारत आता तिसर्या टप्प्यात आहे. या टप्प्यात हा व्हायरस सामाजिक संपर्काद्वारे आणि सामाजिक कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणावर पसरतो. हा सर्वात अवघड टप्पा आहे.
भारतातील कोरोना व्हायरस आता तिसरा आठवडा ओलांडून तो चौथ्या आठवड्यात प्रवेश करीत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुढील 2 आठवडे अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या काळात फैलाव रोखण्यात यश आले तर भारत कोरोना मात करु शकेल. इटली देशात पहिल्या आठवड्यात 3, दुसर्‍या आठवड्यात 152 आणि 3 आठवड्यात तब्बल 1036 कोरोना बाधित आढळून आले होते. त्यानंतर चौथ्या आठवड्यात ही संख्या 6 हजार 362 झाली आणि पाचव्या आठवड्यात ती तब्बल 21 हजार 157 कोरोनाबाधितांपर्यंत पोहचली. त्यामुळे आता इटलीमध्ये दर दिवशी मृत्यू पडणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. इटलीने सुरुवातीपासून खबरदारी न घेतल्याने चीन पाठोपाठ इटलीमधून हा कोरोना विषाणू जगभर पसरला आहे. अशीच स्थिती स्पेनमध्ये घडली. स्पेनमध्ये पहिल्या आठवड्यात 8, तिसर्‍या आठवड्यात 674 आणि चौथ्या आठवड्यात 6 हजार 43 कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे इटलीने संपूर्ण देश बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमध्ये पहिल्या आठवड्यात फक्त 2 कोरोना  बाधित आढळले होते. त्यानंतर दुसर्‍या आठवड्यात ही संख्या 43 झाली. तिसर्‍या आठवड्यात 245 आणि चौथ्या आठवड्यात एकदम 4 हजार 747 वर गेली. त्यानंतर 5 व्या आठवड्यात तब्बल 12 हजार 729 जण कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे. इराणकडे इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बाधितांची व संशयितांच्या सँपलची तपासणी करण्याची यंत्रणाच नाही. त्यामुळे आता त्यांना भारत मदत करत आहे. फ्रान्समध्येही आता चौथ्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 499 इतकी झाली आहे. अमेरिकेत तिसर्‍या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या 613 इतकी आहे. त्यामानाने भारताने अगोदरच खबरदारी घेण्यास सुरुवात केल्याने भारतात तिसर्‍या आठवड्याअखेर कोरोना बाधितांची संख्या 114 पर्यंत गेले आहे. भारतात सर्वाधिक 33 कोरोना बाधित हे महाराष्ट्रात आहेत. त्यातील निम्मे क ोरोनाबाधित हे पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. या बाधितांकडून सामान्य नागरिकांपर्यंत या विषाणूचे संक्रमण होण्याचा मोठा धोका आहे. जगभरातील विविध देशातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहिल्यावर प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशात त्याचा यापुढे फैलाव होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या तरी तो परदेशातून आलेल्या नागरिकांपुरता सिमित आहे. पिंपरी चिंचवडमध्ये परदेशातून आलेल्या एकामुळे त्याचा प्रसार स्थानिक कुटुंबापर्यंत तो पोहचला आहे. यापुढील काळात तो स्थानिक नागरिकांमध्ये पसरू नये, यासाठी प्रचंड काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने सोमवारपासून अनेक कठोर  निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सहल, लग्न समारंभ, वाढदिवस असे कार्यक्रम काही दिवस पुढे ढकलल्यास फारसा फरक पडणार नाही. पर्यटनाला पुढील वर्षीही जाता येईल. वाढदिवस दर वर्षी येत असतो.  त्यामुळे असे कार्यक्रम पुढे ढकलून नागरिकांनी जास्तीतजास्त शासनाला सहकार्य करणे व आवश्यक ती खबरदारी सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे. पुढील दोन आठवडे संपूर्ण भारतासाठी अतिशय महत्वाचे  ठरणार आहे. इटलीसारख्या छोट्या देशात एका आठवड्यात करोना बाधितांची संख्या 10 हजारावर गेली होती. जर आपण काळजी घेतली नाही तर देशात पुढील महिन्याभरात केवळ हजार नाही तर कोरोना बाधितांची संख्या लाखापर्यंत पोहचू शकते. त्यामुळे पुढील एक महिना भारताच्या वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि आव्हानात्मक असणार आहे. हे सर्व पाहता आम्हाला काही होणार नाही, असे न म्हणता  शासनाच्या निर्णयामुळे तुमच्या काही अडचणी होणार असल्या तरी भवितव्याचा विचार करुन त्याला साथ द्या व घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्या, असे आवाहन सर्वत्र करण्यात येत आहे.