Breaking News

करोनामुळे जीडीपी 2.5 टक्के राहण्याची शक्यता

नवी दिल्ली : करोनाचे संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केल्यामुळे देशभरातील सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण होण्याचा अंदाज बार्कलेजने आपल्या अहवालात नोंदवला आहे. 
तीन आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे 2020 च्या कॅलेंडर वर्षात भारताचा जीडीपी विकासदर 2.5 टक्क्यांपर्यंत घसरु शकतो असे म्हटले आहे. सुरुवातीला भारताने 2020 मध्ये 4.5 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता. अनेक रेटिंग संस्था तसेच आयएमएफ आणि जागतिक बँकेसारख्या आर्थिक संस्थांनीही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी निराशाजनक अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे मुडीजनेही जी-20 देशांमध्ये मंदीचा अंदाज वर्तवला आहे. ब्रिटनमधील आर्थिक कंपनी बार्कलेजने आपल्या अहवालात लॉकडाऊनचा कालावधी आणखी एक आठवडा वाढवला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. लॉकडाऊन चार आठवड्याचा असेल. त्यानंतर 8 आठवडे आंशिक लॉकडाऊनही लागू होईल. यामुळे अर्थव्यवस्थेचे 120 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. तीन आठवड्याच्या लॉकडाऊननेच 90 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान जीडीपीच्या 4 टक्के आहे. अशा पद्धतीने जीडीपीचा दर 2 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे बार्कलेने भारताचा विकास दराचा अंदाज 4.5 टक्क्यांनी घटवून 2.5 टक्के केला आहे. जर असे झाले तर 1992 च्या आर्थिक सुधारणांनंतरचा हा सर्वांत कमी विकासदर असेल. जागतिक बँकेच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था 1991 मध्ये 1.06 टक्क्यांच्या वेगाने  वाढली होती. त्यानंतर देशात आर्थिक सुधारणांमुळे वेग आला. 2020-21 साठी जागतिक बँकेने विकासदर 3.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.