Breaking News

परदेशातील 276 भारतीय कोरोनाबाधित


नवी दिल्ली ः परदेशात राहणार्‍या किंवा काही कामानिमित्त त्या ठिकाणी गेलेल्या 276 भारतीय नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी लोकसभेत दिली. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढ चालली आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 148 रुग्ण आढळले आहे. तर जगभरात 1 लाख 98 हजार 518 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एका लिखित उत्तराद्वारे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ’इराणमध्ये 255 भारतीय कोरोनाबाधित आहेत. यूएईमध्ये 12 आणि इटलीमध्ये 5 भारतीय कोरोनाबाधित आहेत. तर हाँगकाँग, कुवेत, रवांडा आणि श्रीलंकामध्ये प्रत्येकी एक-एक भारतीय कोरोनाबाधित आहेत.’ चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे सध्या जगभरात भितीचे वातावरण आहे. भारतात देखील या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 148 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 5 हजार 700 नागरिकांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. जगभरात कोरोनाने 7 हजार पेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. तर जगभरात 1 लाख 94 हजार नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.