Breaking News

संपूर्ण राज्यात सिनेमा-नाट्यगृहे, तलाव, जीम बंद राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या 32 वर


मुंबई : करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरला लागू करण्यात आलेले निर्बंध आता संपूर्ण राज्याला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात 31 मार्चपर्यंत नाट्यगृहे, सिनेमागृहे, जलतरण तलाव आणि व्यायामशाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्रक पाठवून तसे आदेशच दिले आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यात करोनाचे 32 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील दहा शहरांमध्ये करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करोनाच्या फैलावाची व्याप्ती पाहता राज्यसरकारने मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूरसाठी जे निर्बंध शुक्रवारी लागू केले होते. ते सर्व निर्बंध आता संपूर्ण राज्यांना लागू केले आहेत. जगभरात करोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, करोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात करोनाग्रस्तांची संख्या 93 वर पोहचली आहे.
देशभरात कोरोना विषाणूग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना विषाणूच्या बाबतच्या ताज्या आकडेवारीनुसार पॉझिटिव्ह प्रकरणांचा आकडा रविवारी 93 पर्यंत पोहोचली आहे. देशात दोन रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या आजारामुळे संपूर्ण जगभरात 5000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांनी शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक संस्था आणि चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यात निषेधाज्ञा जारी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाचहून अधिक लोकांना एकत्रित येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गोवा सरकारनेही जलतरण तलाव आणि पब रविवारी मध्य रात्रापासून बंद करण्याची घोषणा केली आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठानेही खबरदारीचा उपाय म्हणून 22 मार्चपर्यंत सर्व वर्ग बंद ठेवले आहेत. सर्व संमेलन, कार्यशाळा, शैक्षणिक सहली आणि क्रीडा कार्यक्रम 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. तर विद्यापीठ आणि शाळांमधील परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार. पंजाब सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गर्दी करु नये असे आदेशही देण्यात आले आहेत. एक रुग्ण औरंगाबाद, एक रुग्ण अहमदनगरला, दोन यवतमाळला, तर एक जण मुंबईत भरती आहे. या पाच जणांबरोबरच मुंबईत आणखी चार जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदुजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णांची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे 37 आणि 59 वर्षांचे पुरुष असून, त्यांचा अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाइन्स प्रवासाचा इतिहास आहे.