Breaking News

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 38 वर मुंबईत आणखी चार नवे रुग्ण सापडले


मुंबई ः महाराष्ट्रात कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आणखी तीन कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहे. तर नवी मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 38 वर पोहचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी ही माहिती दिली.
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 38 झाली आहे. चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात भितीचे सावट आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 115 वर पोहचला आहे. भारतातील कोरोनाबाधितांची सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 38 रुग्ण आढळले असून पुण्यात सर्वाधिक 16 रुग्ण आहेत. या सर्वांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. महाराष्ट्रात सोमवारी चार नवे रुग्ण आढळून आले आहे. यामधील तिघे मुंबईतील तर एक नवी मुंबईतील आहे. यामधील दोन जण कुटुंबाच्या संपर्कात आले तर इतर दोघेजण परदेशात प्रवास करुन आलेले आहेत. पनवेलमधील विलगीकरण कक्षात 33 जणांना ठेवण्यात आले असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. कोणीही पळून गेलेले नसून चुकीची अफवा पसरली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाची बैठक पार पडली असून फक्त शहरी भागातील नाही तर ग्रामीण भागातील शाळाही बंद केल्या पाहिजेत. तसंच सर्व परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजेत यावर सर्वांचे एकमत झाले. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी कशी कमी करता येतील यावरही चर्चा झाली. खासगी कंपन्यांना बंद करण्याचा निर्णय घेतला पाहिजे यावरही चर्चा झाली. नवे काही आदेश दिले पाहिजेत का ? यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत सहली किंवा व्यावसायिक दौर्‍यांवर निर्बंध घातले आहेत. खासगी सहल कंपन्या (टूर ऑपरेटर) किंवा व्यक्तींना असे दौरे 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत आयोजित करता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलम 188 अन्वये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. मॉल्स, सिनेमागृहे, नाटयगृहे, शाळा-महाविद्यालये याबरोबरच संग्रहालयेही बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून मुंबईत पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.


 
दिल्लीतील दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
दिल्लीत करोना व्हायरसची लागण झालेल्या दोन रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीत आतापर्यंत करोनाची सात प्रकरणं समोर आली आहेत. यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोना चाचणीत पॉझिटिव्ह आल्याने दाखल करुन घेण्यात आलेल्या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या -
पुणे - 16
मुंबई - 8
ठाणे - 1
कल्याण- 1
नवी मुंबई -  2
पनवेल - 1
नागपूर - 4
अहमदनगर - 1
यवतमाळ - 3
औरंगाबाद - 1