Breaking News

दिल्लीतील 46 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्ती 813 जणांच्या संपर्कात


नवी दिल्ली : इटलीहून 20 फेब्रुवारीला दिल्ली विमानतळावर उतरलेला एक 46 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह (कोविड-19) आढळून आला आहे. ही व्यक्ती पश्‍चिम दिल्लीतील जनकपुरी येथील रहिवासी असून इटलीहून मायदेशी परतल्यापासून तो 813 जणांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येते. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा आता शोध घेतला जात आहे. या व्यक्तीच्या 68 वर्षीय आईचा कोरोना विषाणूमुळे शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणारे हे देशातील दुसरे प्रकरण आहे. हा व्यक्ती कामानिमित्त यूरोप खंडातील 4 देशांमध्ये गेला होता. यामध्ये इटलीचाही समावेश होता. इटलीही कोरोना विषाणूचा सर्वाधिक पार्दुभाव झालेल्या देशात येते. आतापर्यंत तिथे यामुळे 1400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला हा दिल्लीतील पाचवा रुग्ण आहे. भारतात आल्यापासून हा व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आला. या व्यक्तीचे स्क्रिनिंगही केले होते. परंतु, त्यामध्ये त्या व्यक्तीचा अहवाल सामान्य आला होता. तो आपल्या सहा सहकार्‍यांसोबत परदेशात गेला होता. विशेष म्हणजे सर्व सहकार्‍यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याला कोणतीही बाधा झाली नव्हती. पण अचानक त्याला ताप आला, असे त्याच्या एका नातेवाईकाने सांगितले. कोरोनाग्रस्त व्यक्तीला वेगळे ठेवण्यापूर्वी त्याचा आपल्या घरी पत्नी आणि दोन मुलांशी संपर्क झाला होता. त्याची आई त्याच्या धाकट्या भावाकडे दुसरीकडे राहत होती. आई सातत्याने त्याच्या घरी भेट देत असत. त्याच्या कुटुंबातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ते राहत असलेले घर ही सील करण्यात आले आहे. प्रत्येकजण घाबरला आहे. आधीच आम्ही कुटुंबातील एकाला गमावले असल्याचे’ त्याच्या कुटुंबातील एकाने सांगितले.