Breaking News

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 49 वर दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर ; देशभरात 177 रुग्ण


नवी दिल्ली/मुंबई : जगभरात करोना विषाणूने थैमान घातले असून, भारतात देखील करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या 177 पर्यंत पोहचली असून, महाराष्ट्रात सर्वाधिक 49 रुग्ण आढळून आले आहे. अनावश्यक गर्दी करु नका, काळजी घ्या, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केले आहे.
महाराष्ट्रात आढळलेल्या 49 रुग्णांपैकी 40 रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत. त्यांना आधीपासूनच कोरोनाची लागण झालेली होती. त्यांच्यामुळे इतर 9 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. तर मुंबईमध्ये दोन रुग्ण वेंटिलेटरवर आहेत त्यांच्यावर कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर राज्यातील इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे देखील त्यांनी सांगितले. राज्यामध्ये आज आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये लंडनवरुन मुंबईत आलेल्या 22 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झालेली आहे. तर अहमदनगर येथे दुबईवरुन आलेल्या एका वयोवृध्दाला कोरोनाची लागण झाली असल्याचे, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या सूचनांचे जनतेने पालन करावे. अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, राज्यामध्ये लॅबची संख्या वाढवण्यात येत आहे. कालपर्यंत 3 लॅब होत्या आता त्याची संख्या 6 करण्यात आली आहे. आयसीएमआरची नवीन लॅब सुरु करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत. खासगी लॅबने स्वत: खर्च केला आणि जनतेला मोफत सुविधा दिली तर त्यांना देखील परवानगी देऊ, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. घरामध्ये सुरक्षित रहा आणि काळजी घ्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करतांना म्हटले आहे की, ज्या सूचना सरकारने दिल्या आहेत त्या पाळा. कृपा करून घराबाहेर पडू नका, गर्दी कमी करा, अनावश्यक प्रवास टाळा, वर्क फ्रॉम होम करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसंच, कोरोनाशी लढण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. मात्र यंत्रणा आहे हे लक्षात घेऊन त्यावर ताण येणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कारण यंत्रणेत काम करणारे आपले नातेवाईक, मित्र, सहकारी आहेत. ते जीवाची पर्वा न करता 24 तास लढत आहेत. त्यांच्या मदतीसाठी आपण घरी रहावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रवास टाळा असे सरकारकडून वारंवार आवाहन केले जात आहे. तरी सुध्दा अनावश्यक प्रवास होत आहे. हा विषाणू हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत आहे. राज्यात रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आपल्याकडे असलेले रुग्ण हे बाहेरुन आलेले आहेत. त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण झाली आहे. संकट हे आपत्तीसाखे असते. सर्वांनी एकजुटीने मुकाबला केला तर हे संकट आपले काहीही वेडेवाकडे करु शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, बाहेरच्या देशातून जे लोकं येत आहेत ते आपलेच आहेत. सगळ्यांनी सुरक्षित राहावे. दिलेल्या सूचना पाळा. हातावर क्वारंटाइन स्टॅम्प मारलेले लोकं इथे तिथे फिरत आहेत. आपली प्रवासाची माहिती लपवत आहेत. हे योग्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ट्रेन, बसमधील गर्दी कमी करा. सरकार निर्णय घेऊ शकते. पण तिथपर्यंत जाण्याची माझी इच्छा नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले. तसंच, पंतप्रधानांशी माझे बोलणे झाले असून केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.