Breaking News

राज्यात करोनाबाधितांची संख्या 52 वर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती आणखी तिघांना लागण


मुंबई ः राज्यातील कोरोना विषाणूबाधितांच्या संख्येत आणखी तिघांची भर पडली असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचवेळी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि रुग्णालयात दाखल असलेल्या पाच जणांची प्रकृती आता उत्तम आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राजेश टोपे म्हणाले, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि ठाणे येथील कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात आणखी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. तीनपैकी प्रत्येकी एक जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईतील आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता 52 झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी 22, मार्चला जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या आवाहनाचे पालन करावे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी आवाहन करूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी झालेला नाही. अजून लोकल, बेस्ट बसेस यामध्ये गर्दी असल्याचे दिसते. त्यामुळे आता काही शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबतही गंभीर निर्णय घेण्याची गरज आहे, असेही राजेश टोपे म्हणाले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार 59 वर्षीय फिलिपाइन्स नागरिक असलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे 16 मार्च रोजी स्पष्ट झाले. या व्यक्तीला नंतर कस्तुरबा रुग्णालयात भरती  करण्यात आले. त्यानंतर तो ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला आहे अशा व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या  मित्रांपैकी त्याच्या एका मित्रालादेखील या विषाणूचा संसर्ग झाला आहे. मध्य रेल्वेच्या पुढाकाराने आता या मार्गावरून प्रवास केलेल्या  व्यक्तींचा  शोध घेण्यात येत आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये  किंवा इतरांना त्याची बाधा होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 5 मृत्यू झाले आहे तर राज्यात बाधितांची संख्या ही 52 वर पोहोचली आहे. देशातील 20 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील 20 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक आणि पंजाबमध्ये एक अशा एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्‍चिम बंगाल, छत्तीसगड, पद्दूच्चेरीमध्ये 1, दिल्लीमध्ये 17, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 15, केरळमध्ये 28, महाराष्ट्रात 49, पंजाबमध्ये 2, तेलंगणामध्ये 16, गुजरात 2, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 19, लडाख 10, तमिळनाडू 3, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.