Breaking News

पंतप्रधान मोदींचा नामोल्लेख टाळल्याने भाजपमध्ये नाराजी 80 टक्के योजना केंद्राच्या असल्याचा दावा


कर्जत/प्रतिनिधी ः
कर्जत -जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सोमवारी माहिजळगाव येथे महाराजस्व अभियान राबविले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्र्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे. या अभियानात केंद्र सरकारच्या योजना राबविल्या जात असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख तसेच छबी वापरण्यात आली नाही. यावर कर्जत तालुका भाजपच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत बैठक घेऊन पत्रकही काढण्यात आले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, राबविल्या जात असलेल्या योजनेतील 80 टक्के योजना केंद्राच्या आहेत. असे असतानाही पंतप्रधानांचा नामोल्लेख करण्याचे सौजन्य आमदार रोहित पवार यांनी दाखवलेले नाही. केंद्र सरकार पुरस्कृत अनेक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार करत आहे. कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता तळागाळातील सामान्य लोकांना भावतील अशा योजना राबविल्या जात आहेत.कुठल्याही प्रकारचा पक्षीय भेदभाव अथवा राजकारण यात नाही.
  80 टक्के निधी केंद्र सरकारचा असताना आपल्या मंत्र्यांच्या उपस्थितीत या योजनांसाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा घाट रोहित पवार यांनी घातला आहे. सामान्य लोकांना न्याय मिळावा याबद्दल कोणाचेही दुमत नाही.  परंतु केंद्राच्या योजना स्वतःच्या जाहिरातीसाठी वापरणे योग्य नाही. केंद्र शासनाच्या लाभार्थी योजनांचा लाभ देत असताना पंतप्रधानांचा साधा नामोल्लेख अथवा कार्यक्रमाच्या माहितीपत्रकात छबी वापरलेली नाही. यातून आमदार रोहित पवार काही काळ जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी होत असले तरी सामान्य लोकांना सत्य समजल्याशिवाय राहणार नाही, असे तालुकाध्यक्ष सुनील गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
कर्जतचेे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, अशोक खेडकर, तालुका उपाध्यक्ष धनंजय मोरे, बाबुराव गायकवाड, अल्लाउद्दीन काझी, रामदास हजारे, स्वप्नील देसाई, सचिन पोटरे, अंगद रुपनर, प्रकाश शिंदे, पप्पू धोदाड यांच्यासह तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.