Breaking News

देशात कोरोनाचा दुसरा बळी करोना रुग्णांची संख्या 90 वर; महाराष्ट्रात सर्वाधिक 22 रुग्ण


नवी दिल्ली : जगभरातील 125 देश करोनामुळे त्रस्त असून, भारतात देखील रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. शनिवारी दिल्लीमध्ये करोनाग्रस्त एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे भारतात आता करोनाने दुसरा बळी घेतला आहे. याआधी कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. भारतात आतापर्यंत करोनाचे 90 रुग्ण झाले असून, यामध्ये 17 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा सर्वाधिक 22 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे.
दिल्लीमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या मुलाला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या महिलेचा मुलगा मागच्या महिन्यात स्वीझरलँड आणि इटलीचा प्रवास करुन आला होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या घरातील सर्वांची तपासणी करण्यात आली असता त्याच्या आईला सुध्दा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांना 7 मार्च रोजी राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. मात्र कोरोनामुळे 9 मार्च रोजी तिची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर तिला अतिदक्षता विभागात नेण्यात आले. अशातच उपचारा दरम्यान 13 मार्च रोजी रात्री उशिरा महिलाचा मृत्यू झाला.’ दरम्यान, भारतामध्ये 82 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 17 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, करोनाचे रुग्ण भारतात ठणठणीत होतांना दिसून येत आहे. सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची नोंद दिल्लीत झाली आहे. यामध्ये केरळमधील 3 रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. याव्यतिरिक्त तेलंगानामध्येदेखील एक कोरोना व्हायरसने संसर्गित रुग्ण उपचार घेऊन बरा झाला आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रकरणांमध्ये 65 भारतीय, 16 इटालीयन आणि एक कॅनाडन नागरिकाचा समावेश आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांचाही शोध घेऊन त्यांच्याही चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत या प्रक्रियेत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 4,000 हून अधिक लोकांची ओळख पटली आहे. या सर्वांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.