Breaking News

रस्ता मुरमीकरणाचे बिल देऊ नये दिगंबर फुंदे यांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन


पाथर्डी/प्रतिनिधी ः
तालुक्यातील भुतेटाकळी गावातील भगवाननगर ते वामनभाऊनगर रस्त्यावर चालू असलेल्या मुरुमीकरणाच्या कामाचे ग्रामपंचायतकडून कुठलेही अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले नाही, असे ग्रामपंचायतचे माजी सदस्य दिगंबर फुंदे यांचे म्हणणे आहे. या कामाचे भविष्यात बिल अदा करु नये, अशी मागणी त्यांनी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
              तालुक्यातील भुतेटाकळी गावातील भगवाननगर ते वामनभाऊनगर या रस्त्यावर सध्या मुरुमीकरणाचे काम सुरु आहे. ते अनधिकृतपणे चालू आहे. या कामाला ग्रामपंचायतकडून कुठलेही अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले नाही. तरीही या रस्त्याचे काम चालू आहे. तसेच या रस्त्यासाठी लागणारा मुरूम हा अवैधपणे खोदण्यात आलेला आहे. तरीही या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच या रस्त्याच्या कामाचे भविष्यात कुठल्याही योजनेतून बिल अदा करण्यात येऊ नये, असे फुंदे यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत गटविकास अधिकारी मुंडे यांना निवेदन दिले आहे.