Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद द्या महसूलमंत्री थोरात यांचे आवाहन


अहमदनगर / प्रतिनिधी :
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. आपला देश आणि राज्यशासनही त्याचा मुकाबला करीत आहे. अशावेळी हे संकट टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा जे जे प्रयत्न करीत आहेत. त्यांना प्रतिसाद द्या आणि स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
ते म्हणाले, नागरिकांनी अत्यावश्यक परिस्थिती वगळता गर्दीत बाहेर जाणे टाळावे. परदेशातून कोणी व्यक्ती परत आला असेल तर त्याची माहिती जिल्हा यंणत्रेला द्यावी आणि संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील १२६ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ७३ जणांना जिल्हा रुग्णालय तसेच इतर रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. उर्वरित ५१ जणांना त्यांच्या घरी देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन व्यक्ती कोरोना विषाणू संसर्गाने बाधित असल्याचे आढळून आल्याने त्यांचे विलगीकरण करुन स्वतंत्रपणे उपचार सुरु आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती महसूलमंत्री थोरात यांनी घेतली. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महसूलमंत्री थोरात यांना सध्या कोरोना विषाणू संसर्गासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यावर समाधान व्यक्त करीत ना. थोरात म्हणाले की, पुढील दोन आठवडे अतिशय महत्वाचे आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ज्या उपाययोजना केल्या आहेत, नागरिकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. कारण ही सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. संसर्ग होऊ नये, तो वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. संपर्क टाळा, असे आवाहनही त्यांनी केले.