Breaking News

महिलांनी मानसिकता बदलण्याची गरज

अहमदनगर/ प्रतिनिधी : “महिलांनी त्यांची मानसिकता बदलण्याची गरज असून महिलांच्या छळवणुकीस महिलाच जबाबदार असतात. महिलांनी मानसिकता बदलल्यास अन्याय करणार्‍या महिला व त्या सहन करणान्या महिला ह्या दोघींच्या ही भूमिकेत बदल होईल. जेष्ठ नागरिकांच्या कायदेविषयक तरतुदी संदर्भातील कायदा तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. नुसते कायदे करुन हातात काही येत नाही तर कायदे सर्वांना माहिती होणे व त्याची अंमलबजावणी होणे महत्वाची आहे’’, असे प्रतिपादन न्यायमूर्ती साधना जाधव यांनी केले.
न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथे ज्येष्ठ नागरीक, महिला व बालहक्क संरक्षण कार्यशाळा न्यू लॉ कॉलेज, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर व न्यायाधार संस्था, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व उद्घाटक यांनी बाल हक्क संरक्षण, ज्येष्ठ नागरीक, महिला यांचे कायद्यासंबंधी विचार व्यक्त करताना महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व यावर त्यांनी विविध न्यायालयीन खटल्यांचा संदर्भ देऊन आपले मत मांडले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक न्यायाधार संस्थेच्या अ‍ॅड. निर्मला चौधरी यांनी केले. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करुन प्रथम सत्रास सुरवात झाली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रा. ह. दरे, सहसचिव  विश्‍वासराव आठरे पाटील, सस्थेचे सदस्य जी. के. पाटील, जयंत वाघ, निर्मला काटे, अरुणा काळे, अ‍ॅड. शारदा लगड, सी. वायकर, नीलिमा जाधव इ उपस्थित होते. तसेच अ‍ॅड. सुरुणा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
द्वितीय सत्रात अ‍ॅड. योहान मकासरे, सेवानिवृत्त सरकारी पोलिस अभियोक्ता यांनी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 हा कायदा अतिशय ओघवत्या भाषेत प्रतिपादन केला.
प्रास्ताविक प्राचार्य तांबे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन ‘महिला व बालकल्याण’च्या सभापती लता शेळके यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपमहापौर  मालन ढोणे यांनी महिला दिन, त्याचा इतिहास, जागतिक पातळीवर त्याचे स्थान याचा आढावा घेतला. याप्रसंगी सूत्रसंचालन प्रा. खुळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. रामेश्‍वर दुसुंगे यांनी करुन दिली व आभार प्रा. डॉ. पांढरे यांनी मानले.